“…तर मग सगळं सांगावं लागेल”,- अमोल कोल्हे

0
177

“…तर मग सगळं सांगावं लागेल”, अमोल कोल्हेंचं अजित पवारांबाबत सूचक विधान; म्हणाले, “त्यांना विचारा की मी…”

अमोल कोल्हे म्हणाले, “अजित पवारांना विचारा की उद्या जर मी त्यांच्या गटाकडून लढायला तयार झालो, तर…!”

शिरूर, दि. 5 (पीसीबी) :

अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर हल्लाबोल!

अमोल कोल्हे यांना उमेदवारी देऊन चूक केली, असं विधान अजित पवार यांनी शिरूरमध्ये घेतलेल्या सभेत केलं. या विधानावरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चा चालू आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्याबाबत शिरूरमध्येच अजित पवारांनी केलेलं विधान स्थानिक पातळीवर चर्चेचा विषय ठरलं आहे. यावेळी अमोल कोल्हे पहिल्या दोन वर्षांतच राजीनामा द्यायला आले होते, असा दावाही अजित पवारांनी केला आहे. त्यासंदर्भात आता अमोल कोल्हेंनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?
शिरूरमधील सभेत अजित पवारांनी अमोल कोल्हेंवर टीका केली. “वक्तृत्व चांगले आहे. दिसायलाही रुबाबदार आहे. पुढे काही तरी चांगले काम करतील, असे वाटल्यानेच अन्य पक्षाचे असतानाही त्यांना उमेदवारी दिली. मात्र ते दोन वर्षातच कंटाळले. निवडून आल्यानंतर दोन वर्षांतच कोल्हे यांनी राजीनामा देण्याची भाषा सुरू केली. जनतेने पाच वर्षांसाठी निवडून दिले आहे. त्यामुळे दोन वर्षांत राजीनामा देणे योग्य नाही, असे मी त्यांना सांगितले. मात्र कलावंत असल्याने त्याचा व्यावसायावर परिणाम होत आहे. सेलिब्रेटी असल्याने रोज मतदारसंघात येणे शक्य नाही, असे कोल्हे यांनी सांगितले”, असा दावा अजित पवारांनी केला.

अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर
दरम्यान, अमोल कोल्हेंनी अजित पवारांच्या दाव्याला प्रत्युत्तर दिलं आहे. “सगळ्याच खासगीतल्या गोष्टी सांगायच्या ठरल्या, तर सगळं सांगावं लागेल. ते आमचे तत्कालीन नेते होते. त्यांच्याकडे मी तो विचार बोलून दाखवला होता. पण हे कृतीत आलं का कधी? संसदेत माझी उपस्थिती कमी झाली का? संसदेत मी शेतकऱ्यांची बाजू घेऊन हिरीरीने भांडतोय, यात कुठे कमतरता दिसली का?” असा प्रश्न त्यांनी अजित पवारांना विचारला.

सुनील तटकरेंच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह
यावेळी अमोल कोल्हेंनी अजित पवारांना सुनील तटकरेंच्या कामगिरीचं मूल्यमापन करण्याचा सल्ला दिला आहे. “सध्या अजित पवारांच्या गटाचे प्रदेशाध्यक्षही खासदार आहेत. अजित पवार आता राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांनी याचं मूल्यमापन करावं की त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांची संसदेत काय कामगिरी आहे. तीन वेळा संसदरत्न पुरस्कार उगाच मिळत नाही. मनात आलेला विचार बोलून दाखवणं आणि प्रत्यक्ष कृती यात काहीच संदर्भ दिसत नाही. काम करण्यात मी कुठे कमी पडलो, याचंही उत्तर त्यांनी द्यावं”, असं अमोल कोल्हे म्हणाले.