… तर भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांना दगाफटकासुध्दा संभवतो , पुण्यातील संस्थेचा पाहणी निष्कर्श

0
329

पुणे, दि. २४ (पीसीबी) – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अपेक्षित मतविभाजन होण्याची शक्यता धूसर असून केवळ तिरंगी लढतीच्या लाभापोटी आभास निर्माण केल्याचे चित्र दिसून येत आहे. अनुकूल मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी माजी आमदार कै. लक्ष्मण भाऊंची पद्धत अवलंबली नाही तर भाजपला दगा-फटका बसण्याची शक्यता देखील दिसून येत आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील तिरंगी लढतीत बंडखोर अपक्ष उमेदवाराला मतदारांचा अत्यल्प पाठींबा मिळत असल्याने अपेक्षित मतविभाजन होण्याची शक्यता कमी आहे. मतविभाजनाचा लाभ मिळेल या आशावादावर अवलंबून राहणे भाजप उमेदवाराला हानिकारक असून अनुकूल मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी गरज निर्माण झाली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात गावठाण भागातील गावकी-भावकीचे मतदार वगळता अन्य सर्व मतदार बाहेरील स्थायिक झालेले असून त्यांना हाताळण्याची कै. लक्ष्मण भाऊंची एक पद्धत होती त्यामुळेच पक्ष व चिन्ह कोणतेही असो यश निश्चित मिळत होते. अनुकूल मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी कै. लक्ष्मण भाऊंची पद्धत अवलंबली नाही तर भाजपला दगा-फटका बसण्याची शक्यता आहे.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील तिरंगी लढतीत भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना सर्व भागातून सर्वाधिक मतदारांचा पाठींबा मिळत असल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला असल्याचे भाजप पक्ष पदाधिकारी यांना वाटत आहे. अन्य उमेदवारांमध्ये महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे आणि अपक्ष बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना ठराविक भागातूच पाठींबा आणि अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे जरी दिसून येत तरी देखील अपेक्षित मतविभाजन होणार नाही हे मतदारांच्या प्रतिसादावरून स्पष्ट होत आहे.

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेच्या वतीने अल्प मतदान झालेल्या केंद्रातील मतदारांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे या अभियानात मतदारांची मतदान करण्याविषयी भुमिका व प्रतिक्रिया समोर येत आहेत. याप्रमाणे अल्प मतदान होत असलेल्या केंद्रावर प्रशासनाबरोबरच राजकीय पक्षांनी देखील मतदानाचे प्रमाण जास्तीत होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेच्या वतीने मागील निवडणुकांमध्ये अल्प मतदान झालेल्या केंद्रांचे विश्लेषणात्मक अहवाल पुणे जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी नियुक्त केलेल्या स्वीप (SVEEP – Systematic Voters’ Education and Electoral Participation) कार्यक्रम व्यवस्थापन समितीला 2019 मध्ये सुपूर्त केला होता. सदर अहवालानुसार चिंचवड विधानसभा मतदारसंघातील 44 मतदान केंद्रावर खूपच अत्यल्प मतदान होत असल्याचे निदर्शनास आले. यामध्ये चिंचवड विधानसभा क्षेत्रातील चिंचवडगाव, विकासनगर, काळेवाडी, नवी सांगवी, विजयनगर काळेवाडी, जयमल्हारनगर, संतोषनगर थेरगाव परिसर, तापकीर नगर, थेरगाव भाग, सांगवी गाव, वाकड, पिंपळे सौदागर व गुरव काही भाग, श्रीनगर रहाटणी, कस्पटे वस्ती, सुदर्शन नगर, कीर्तिनगर थेरगाव परिसर या भागात काही केंद्रावर अल्प मतदान होत असते. अशा केंद्रावरील समाविष्ट मतदारांमध्ये जनजागृती अभियान राबविले जात आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात 3 लाख 1 हजार 648 पुरुष, 2 लाख 64 हजार 732 स्त्री आणि 35 तृतीयपंथी याप्रमाणे एकूण 5 लाख 66 हजार 415 मतदार संख्या आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदार संख्येत 48 हजार 106 ची वाढ झाली आहे. 510 मतदान केंद्रे आहेत यामध्ये 100 हून अधिक केंद्रावर अल्प तर 44 मतदान केंद्रावर अत्यल्प मतदान होत असते. अत्यल्प मतदानाचा फटका सर्वच राजकीय पक्षांना बसत असतो मात्र त्याचा काही परिणाम जिंकणाऱ्या उमेदवाराच्या मताधिक्यावर देखील होत असतो. मतदारसंघातील संवेदनशील मतदारसंघात नेहमीच जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण केला जातो.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रमुख समाविष्ट भागामध्ये अनुक्रमे सर्वाधिक मतदान पिंपळे गुरव, सांगवी गाव, चिंचवडगाव, थेरगाव, काळेवाडी, पिंपळे सौदागर, वाल्हेकरवाडी, किवळे या भागात आहे. पिंपळे गुरवला 70 हजार त्याखालोखाल अन्य भागात मतदारसंख्या आहे. त्यामुळे या भागातील मतदानाचा कल कोणाकडे असेल त्यावर या निवडणुकीतील यश अवलंबून असते. या भागातून भाजपला सर्वाधिक पाठींबा मिळत असल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर होत असल्याचे मतदारांच्या प्रतिसादावरून स्पष्ट होत आहे. अश्विनी जगताप आणि नाना काटे हे पिंपळे नीलख आणि पिंपळे सौदागर याठिकाणचे असल्याने त्यांचा मतदार तिथे अधिक आहे. तर राहुल कालाटे हे वाकड भागाचे प्रतिनिधित्व करतात या भागात तुलनेने मतदारांची संख्या कमी आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदार दोन प्रमुख वर्गवारीत विभागले जातात. प्रामुख्याने समाविष्ट भागातील गावठाणे भागातील स्थानिक रहिवासी मतदार विविध राजकीय पक्षांच्या गट-तटात विभागले असून उर्वरित मतदारसंख्या राज्यातील विविध भागातून कामानिमित्ताने पुनर्वसित झालेले आहेत. पिंपरी-चिंचवड भागातील राजकारण प्रामुख्याने व्यक्ती केंद्रीत असल्याने पक्षीय राजकारणाला दुय्यम स्थान आहे. व्यक्ती निष्ठ राजकारणामुळे माजी आमदार कै. लक्ष्मण जगताप यांनी वैयक्तीकरीत्या मतदारांशी नाळ जोडलेली आहे. पक्षांतर केले तरी मतदारांचा जनाधार कायम ठेवण्यात त्यांनी यश मिळवले होते. पुनर्वसित झालेल्या मतदारांची मानसिकता विशिष्ट पद्धतीची असल्याने त्यांना हाताळण्याचे कौशल्य केवळ जगताप कुटुंबियांना माहीत आहे. मतदानापूर्वी सदर कै. लक्ष्मण भाऊंची पद्धत यंत्रणा कार्यान्वित केली तर भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांना विजयात कोणताही अडथळा येणार नाही असे मत पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेने व्यक्त केले आहे.

मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत असताना युवकांमध्ये निवडणुकीविषयी उत्साह दिसून येत आहे. मतदारयादीत पहिल्यांदा नाव आलेले व नव्याने मतदार यादीत नाव असलेले मतदार जास्त मतदानासाठी उत्सुक आहेत तर नोकरदार व कामगारांना मतदानात फारसे स्वारस्य दिसून येत नाही. बहुतांश व्यावसायिकांचा मतदान करण्याकडे कल आहे. राज्य व केद्रातील सत्ता असणारा पक्षच मतदारसंघातील प्रश्न सोडवणूक करू शकतो अशास्वरूपाच्या प्रतिक्रिया व्यापारी व व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहेत.

मतदारांची वयोगटांनुसार वर्गवारी केल्यास 18 ते 39 या युवा वयोगटांतील मतदारांची संख्या तब्बल 2 लाख 58 हजार 42 इतकी आहे. यंदा प्रथमच मतदार करणारे नवमतदार 4 हजार 251 आहेत. 20 ते 29 वर्षांचे 84 हजार 575 मतदार आहेत. तर, 30 ते 39 वर्षाचे सर्वांधिक 1 लाख 73 हजार 467 मतदार आहेत. पाठोपाठ 40 ते 49 वयोगटातील 1 लाख 45 हजार 950 प्रौढ मतदार आहेत. 50 ते 59 वयांचे 77 हजार 844 आणि 60 ते 69 वयांचे 48 हजार 84 ज्येष्ठ मतदार आहेत. 70 वर्षांवरील 34 हजार 799 वयोवृद्ध मतदार आहेत. युवा मतदार निम्म्यापेक्षा अधिक असल्याने निवडणुकीत त्यांचा कौल अधिक महत्वाचा ठरणार आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात 1 हजार 500 दिव्यांग मतदार असून आतापर्यंत 189 जणांनी टपाली मतदान केले आहे. सर्व्हिस वोटर्स मतदारांची संख्या १६८ इतकी असून मतदानाच्या आधी दहा दिवस सर्व्हिस वोटर्स मतदारांना ईटीपीबीएस यंत्रणेद्वारे ऑनलाइन पद्धतीने मतपत्रिका पाठवल्या आहेत. तर चिंचवड मतदारसंघात मतदार यादीत अनेक मतदारांची छायाचित्रे नसल्याचे आढळून आले आहे. या मतदारसंघात 9 हजारहून अधिक मतदारांचे छायाचित्रे नाहीत.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात एकूण 5 लाख 68 हजार 954 मतदार आहेत. त्यात 3 लाख 2 हजार 946 पुरुष, 2 लाख 65 हजार 974 महिला आणि 34 तृतीयपंथी मतदार आहेत. त्यात एकूण 12 हजार 313 दिव्यांग मतदार आहेत. तर, 80 वर्षांवरील वयोवृद्ध मतदारांची संख्या 9 हजार 926 आहे. तसेच, 331 अनिवासी भारतीय आणि 168 सैनिक मतदार आहेत. मतदारसंघात एकूण 510 मतदान केंद्र आहे. त्यापैकी 13 मतदान केंद्र संवेदनशील आहेत. कमी किंवा अधिक मतदान होणे. केंद्रांच्या मतदार यादीत एका कुटुंबाची सलग नावे नसणे, बोगस मतदानांच्या तक्रारी अधिक असणे अशी मतदान केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. एकूण 51 केंद्रांचे वेबकॉस्टिंग करण्यात येणार आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदारांची सामाजिकदृष्ट्या स्थितीमध्ये अनुसूचित जाती पेक्षा अनुसूचित जमातीचे प्रमाण अत्यल्प आहे. अनुसूचित जाती (एस. सी.) चे प्रमाण 13.60 टक्के (मतदारसंख्या-77032) असून अनुसूचित जमाती (एस. टी.) चे प्रमाण 3.50 टक्के (मतदारसंख्या-19825) आहे. मुस्लीम समाजाची मतदारसंख्या 89 हजार 494 इतकी असून प्रमाण मतदारांचे 15.80 टक्के इतके आहे. तर इतर घटक (जैन,ख्रिश्चन इ.) मतदारांचे प्रमाण 8.50 टक्के इतके असून ब्राह्मण समाजाच्या मतदारांचे प्रमाण 6.15 टक्के इतके आहे. या मतदारसंघात सर्वाधिक मराठा समाजाचे प्राबल्य असून त्यांच्या मतदारांचे प्रमाण 26.70 टक्के इतके असून मतदारसंख्या 1 लाख 51 हजार 233 इतकी असून त्याखालोखाल इतर मागासवर्गीय (ओबीसी) च्या मतदारसंख्येचे प्रमाण 25.75 टक्के इतके असून मतदारसंख्या 1 लाख 45 हजार 852 एवढी आहे.

कै. लक्ष्मण जगताप यांना २००९ च्या लोकसभा निवडणुकीत चिंचवड मतदारसंघातून 73 हजार 529 इतकी मते मिळाली होती. तर २००९ च्या विधानसभा निवडणुकीत 78 हजार 529 मते मिळाली होती. २०१४ व २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अनुक्रमे 1 लाख 23 हजार 786 तर १ लाख ५० हजार ७२३ मते मिळाली होती. मागील निवडणुकींच्या तुलनेत या निवडणुकीत देखील जनाधार टिकवून ठेवण्यात कुटुंबियांना व भाजप पक्षाला निश्चित यश मिळेल असे अनुकूल वातावरण मतदारसंघात निर्माण करण्यात यश मिळाले आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बंडखोरी झाल्याने मत विभाजनाचा अपेक्षित लाभ होणार नाही मात्र काही प्रमाणातच लाभ होऊ शकतो. राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांनी प्रचारातील समन्वय आणि मतदारांचा अनुकूल पाठींबा मिळवण्याचा प्रयत्न केला असून त्यांनी गावकीच्या मतदारांवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. अपक्ष बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठींबा मिळाला असला तरी त्यांना गेल्या निवडणुकीच्या मतांच्या तुलनेत या निवडणुकीत कमी जनाधार मिळेल कारण मतदारसंघातील बहुतांश भागात अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत चिंचवड विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीला केवळ १७९०२ मतदान झाले होते त्यावेळी ओवेशी यांचा एमआयएम पक्षाची युती होती त्यामुळे मतदारसंघातील मुस्लिम मतांचा समावेश होता आता मात्र वंचित बहुजन आघाडीतून एमआयएम पक्षाने फारकत घेतलेली असल्याने वंचित बहुजन आघाडीचे या मतदारसंघात फारसे संघटन नाही त्यामुळे त्यांच्या पाठिंब्याने राहुल कलाटे यांना फार काही लाभ मिळणार नाही.

सन 2014 च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी मिळून राहुल कलाटे यांना त्यावेळी 63 हजार 489 मते मिळाली होती तर राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांना तिसरया क्रमांकाची मते मिळाली होती. या निवडणुकीत मतविभाजनाचा लाभ कै. लक्ष्मण जगताप यांना झाला होता. तर सन 2014 च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीने स्वतंत्र उमेदवार न देता पाठींबा दिला होता त्यावेळी राहुल कलाटे यांना 1 लाख 12 हजार 225 मते मिळाली होती. अर्थात त्यावेळी राजकीय स्थिती वेगळी होती त्या स्थिती मोठ्याप्रमाणावर बदल झालेला आहे. शिवसेनेत झालेली फाटाफूट आणि राहुल कलाटे यांची फारकत तसेच मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या पासूनचा दुरावा तसेच राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा रोष असल्याने या निवडणुकीत मागील निवडणुकांमध्ये मिळालेल्या मतांपेक्षा अत्यल्प मते राहुल कलाटे यांना मिळतील अशी मतदारसंघातील मतदारांच्या पाठींब्या वरून दिसून येत आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांची प्रचार यंत्रणा चोखपणे राबविली आहे तरीही मतदारसंघातील प्रमुख भागात मतदारांकडून पाठींबा मिळत नसल्याचे दिसून येत आहे. मात्र राहुल कलाटे यांच्या पेक्षा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या चिंचवड मतदारसंघात भाजपचे उमेदवार अश्विनी जगताप यांना प्रथम तर महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना दुसऱ्या आणि राहुल कलाटे यांना तिसऱ्या क्रमांकाचा मतदारांचा पाठींबा व प्रतिसाद मिळत असल्याने भाजपचे उमेदवार अश्विनी जगताप यांना विजयाचा मार्ग सुकर वाटत आहे. केवळ मताधिक्यात वाढ होण्यासाठी मतदानाचे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे.

सार्वत्रिक निवडणुकांपेक्षा पोटनिवडणुकांमध्ये मतदानाचे प्रमाण कमी व अत्यल्प होत असते. त्यामुळे राजकीय संघर्ष बाजूला ठेवून मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रशासनाबरोबरच सर्वच राजकीय पक्ष व संस्था, संघटनांनी प्रबोधनात्मक कार्य करण्याची गरज आहे. मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करताना संवाद साधावा लागतो त्या संवादातून अर्थातच राजकीय मते व पाठींबा देखील काही नागरिक व्यक्त करीत असतात. मतदान हे पवित्र दान असून निर्भीडपणे आपले कर्तव्य बजवावे असे आवाहन या अभियानात केले जात आहे.
निवडणुकीत पक्ष कि व्यक्ती पाहून मतदान करता? या प्रश्नावर 70 टक्के नागरिकांनी व्यक्ती पाहून मतदान करीत असल्याचे सांगितले तर 30 टक्के नागरिक राजकीय पक्ष पाहून मतदान करतात असे दिसून आले. बहुतांश मतदारांनी व्यक्ती पाहून मतदान करतो असे नमूद केले आहे. व्यक्ती केंद्रीत राजकारण केले जात असल्याने अशास्वरूपाच्या प्रतिक्रिया प्रबोधनात्मक अभियानात व्यक्त केल्या जात असल्याचे दिसून येत आहे.

मतदारसंघातील विकासात्मक प्रश्नांवर राज्य व केंद्रातील सत्ताधारी राजकीय पक्षाचा उमेदवारच निवडून आला तरच स्थानिक पातळीवर मतदारसंघात विकास होऊ शकतो असा बहुतांश नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मतदारसंघातील विकासात्मक प्रश्नांवर 65 टक्के नागरिकांना राज्य व केंद्रातील सत्ताधारी राजकीय पक्ष भाजपच्या बाजूने मत व्यक्त केले तर 35 टक्के नागरिक अन्य राजकीय पक्षाला महत्व देत आहेत.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील प्रमुख उमेदवारांमध्ये 49 टक्के नागरिकांनी भाजप उमेदवाराला पाठींबा व्यक्त केला आहे तर महाविकास आघाडीला 35 टक्के नागरिकांनी अनुकुलता दर्शविली आहे त्याखालोखाल अपक्ष बंडखोर उमेदवाराला केवळ 13 टक्के तर अन्य उमेदवारांना 3 टक्के नागरिकांनी पाठींबा व्यक्त केला आहे. मतदान ओळखपत्र गहाळ झालेले सर्वाधिक 42 टक्के नागरिक आढळून आले तर मतदान केंद्रावर मतदान केल्यावर त्या ठिकाणीच ओळखपत्र वितरीत करण्याची सुविधा देण्याची मागणी बहुतांश नागरिकांनी व्यक्त केली आहे. मतदान कोणाला करावे असा दबाव निर्माण करून पराभव झाला तर स्थानिकांकडून उपद्रव होत असल्याने मतदान करीत नाही असे 26 टक्के नागरिकांनी मत व्यक्त केले आहे.

मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून मतदार चिठ्यांचे वाटप केले जात आहे. मतदारांच्या घरी जाऊन केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) जागृती करत आहेत. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष व संघटना, संस्थांनी प्रयत्न करण्याची गरज असून निर्भीडपणे मतदान करण्यास मतदारांना प्रोत्साहित करून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेने केले आहे