“… तर पवार कुटुंबीयांच्या मालकीची संपत्ती महाराष्ट्राच्या नावावर करा”

0
318

सोलापूर, दि. १६ (पीसीबी) – “तीर्थक्षेत्र देहू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू दिले नाही, हा महाराष्ट्राचा अपमान कसा होतो ?”, असा सवाल करीत रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेतेसदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. “पवारांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान वाटत असेल, तर पवार कुटुंबीयांच्या मालकीची संपत्ती महाराष्ट्राच्या नावावर करावी.”, असा खोचक सल्ला देखील खोत यांनी दिला.

सोलापुरात खोत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना, पवार कुटुंबीयांसह शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले. देहू येथे पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलू दिले. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मात्र बोलू दिले गेले नाही, हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. त्यावर भाष्य करताना खोत यांनी पवार कुटुंबीय म्हणजे महाराष्ट्र नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. एकीकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करीत असताना तो महाराष्ट्राचा अपमान नाही का?, असा सवालही त्यांनी केला.

तसेच, “अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा एकत्र येऊन शपथविधी घेऊन मंत्रिमंडळ बनविले होते, तेव्हाचा प्रसंग सुप्रिया सुळे यांनी थोडासा आठवून पाहावा. जेव्हा अजित पवार आणि फडणवीस एकत्र येतात, तेव्हा ते फडणवीस हे मुख्यमंत्री आणि पवार हे उपमुख्यमंत्रीच आहेत, असे वाटते. फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून भाषण केल्यावर उपमुख्यमंत्री पवार यांना राज शिष्टाचारापोटी भाषण करता आले नसावे.”, अशी खोचक प्रतिक्रिया खोत यांनी व्यक्त केली.

याचबरोबर, “राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यसभा निवडणुकीत बसलेल्या धक्क्यानंतर गोंधळ झालेला दिसून येतो. ज्याला त्याला काही कळेना अन् कोणालाही झोप येईना, अशी महाविकास आघाडीची गत झाली आहे. म्हणूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना राष्ट्रपती करण्याची सूचना केली आहे. पवार यांनी अर्थात राष्ट्रपतिपदाचा आपण उमेदवार नाही, असे स्पष्ट केले आहे. खरे तर संजय राऊत यांनी शरद पवार यांचे नाव अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठी सुचवायला हवे होते.”, असा टोला देखील खोत यांनी लगावला.