तब्बल 70 ते 80 लाख लोकांची नोकरी जाऊ शकतात,अशा गाड्या भारतात येऊ देणार नाही

0
229

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी चालकांच्या रोजगाराचे रक्षण करण्यासाठी भारतात ड्रायव्हरलेस कार आणल्या जाणार नाहीत असे ठाम मत व्यक्त केले आहे. रस्त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करताना, भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, “मी अमेरिकेतच सांगितले होते की, मी कोणत्याही किंमतीत भारतात चालकविरहित कार येऊ देणार नाही. याचे कारण म्हणजे, आपल्या देशात, मोठ्या संख्येने लोक ड्रायव्हर म्हणून काम करतात. ड्रायव्हरलेस कारमुळे त्यांच्या नोकऱ्या हिसकावून घेतल्या जाऊ शकतात, यामुळे तब्बल 70 ते 80 लाख लोकांची नोकरी जाऊ शकते, त्यामुळे मी कुठल्याही किमतीत अशा गाड्या भारतात येऊ देणार नाही.”

गडकरींनी ऑटोमोटिव्ह इंजिनीअरिंगमधील प्रगतीवर भर देत म्हटले की, ऑटोमोबाईलमध्ये सहा एअरबॅग्ज समाविष्ट करणे, रस्त्यांवरील खड्ड्यांचे पॅच कमी करणे आणि इलेक्ट्रिक मोटर्स कायद्यांतर्गत दंड वाढवणे, रुग्णवाहिकांच्या प्रवासासाठी अधिक सोय उपलब्ध करून देणे, या गोष्टींवर भर देणे अधिक महत्त्वाचे वाटते. “टेस्लाचे भारतात स्वागत होत असले तरी भारतात विक्रीसाठी चीनमध्ये उत्पादन तयार करणे हा पर्याय नाही. आम्ही टेस्ला भारतात येण्याची परवानगी देऊ पण ते चीनमध्ये उत्पादन करून भारतात विकू शकत नाहीत. हे घडणे अशक्य आहे,” असे गडकरी म्हणाले.

नितीन गडकरी यांनी भविष्यातील इंधन म्हणून हायड्रोजनच्या महत्त्वावर भर दिला आणि सार्वजनिक पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची सरकारची भूमिका सुद्धा सांगितली. “हायड्रोजन हे भविष्यातील महत्त्वाचे इंधन आहे. आम्ही सार्वजनिक पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी सर्वोत्तम तंत्रज्ञान आणण्याच्या दिशेने काम करत आहोत,” असं गडकरी पुढे म्हणाले.

याआधी, नितीन गडकरी यांनी जाहीरपणे देशात विनाचालक वाहने आणण्याच्या कल्पनेवर आपला आक्षेप व्यक्त केला होता. प्रथम जुलै 2017 मध्ये आणि नंतर डिसेंबर 2019 मध्ये सुद्धा गडकरींनी ड्रायव्हर म्हणून काम करणार्‍या व्यक्तींना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागतील हे टाळण्यासाठी विनाचालक गाडीला परवानगी देणार नाही हे सांगितलं होतं.

नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातांविषयी काय सांगितलं?
नितीन गडकरी म्हणाले की, देशात वर्षभरात 5 लाखाहून अधिक रस्ते अपघात होत असतात यात 1 लाखाहून अधिक मृत्यू होत असतात. या दुर्घटनांचा प्रभाव 3.8 टक्के जीडीपीवर सुद्धा होतो. मुख्य म्हणजे या अपघातात दगावलेल्यांमध्ये 60 टक्के लोक हे तरुण आहेत. या अपघातांची मुख्य चार कारणे रस्ते बांधणी, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, अंमलबजावणी, शिक्षण, ही आहेत. यामध्ये सुधारणा व बदल करण्यावर सरकारतर्फे भर देण्यात येईल असेही गडकरी म्हणाले.