पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – शहराची समस्या ओळखून समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्वेक्षण निष्कर्षांचा वापर केल्याबददल गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाच्यावतीने पिंपरी-चिंचवड शहराची ट्रान्सपोर्ट 4 ऑल चॅलेंज स्टेज-1 या स्पर्धेत चॅम्पियन म्हणून निवड झाली आहे. देशातील 130 नोंदणीकृत शहरांमधून, ट्रान्सपोर्ट 4 ऑल चॅलेंजच्या स्टेज-1 स्पर्धेमध्ये पिंपरी -चिंचवड शहराची चॅम्पियन म्हणून गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी घोषणा केली आहे.
सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी, उपाय विकसित करण्याकरीता इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्टेशन अँड डेव्हलपमेंट पॉलिसी (ITDP) च्या भागीदारीत गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने एप्रिल 2021 मध्ये ट्रान्सपोर्ट 4 ऑल चॅलेंज सूरू केले होते. या चॅलेंजच्या पहिल्या टप्प्यात, पिंपरी चिंचवडने शैक्षणिक संस्था, ना-नफा संस्था आणि आयपीटी (IPT) युनियनसह परिवहन क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख सरकारी भागधारकांसह Transport4All Task Force (TTF) ची स्थापना केली. यात 5000 हून अधिक नागरिक, बस ड्रायव्हर आणि कंडक्टर आणि अनौपचारिक सार्वजनिक वाहतूक (शेअर ऑटो, खाजगी बस) चालकांचे सर्वेक्षण करून सार्वजनिक वाहतूक डेटा संकलीत करून समस्या दूर करण्यासाठी पुढाकार घेतला.
याद्वारे पिंपरी-चिंचवड हे शहर 46 चॅम्पियन शहरांपैकी एक असून पुढील स्टेज-2 स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे. यात सार्वजनिक वाहतूक सुरक्षित, सोयीस्कर, परवडणारी आणि सर्वांसाठी प्रवेश योग्य बनवण्यात मदत करण्यासाठी उपाय तयार करण्यासाठी आणि चाचणी करण्यासाठी शहरे स्टार्टअप्ससोबत काम करतील. सेवा देखरेख आणि नियोजन, प्रवाशांची माहिती आणि संवाद, भाडे उत्पादने आणि पेमेंट, वित्तपुरवठा, खरेदी आणि नियमन आणि बस वाहतुकीचे प्राधान्य हे काही प्रमुख उपाय क्षेत्र मानले जात आहेत.
देश महामारीनंतर नवीन सामान्य स्थितीकडे वाटचाल करीत असताना, भारतीय शहरांना सार्वजनिक वाहतुकीत एक सामाजिक हित म्हणून गुंतवणूक करण्याची, अनौपचारिक परिवहन सेवांमध्ये पूर्णपणे सुधारणा करण्याची आणि वापरकर्ता अनुभव सुधारण्यासाठी डिजिटल नाविन्यपूर्णतेला प्राधान्य देण्याची सुवर्ण संधी आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने ITDP च्या सहकार्याने Transport4All आव्हान सुरू केले. सर्व नागरिकांच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सुधारणारे उपाय विकसित करण्यासाठी शहरे, नागरिक गट आणि स्टार्टअप्सना एकत्र आणणे हे चॅलेंजचे उद्दिष्ट आहे.
आव्हानाच्या केंद्रस्थानी असे नागरिक आहेत, जे केवळ समस्याच परिभाषित करणार नाहीत. ज्यासाठी उपाय तयार केले जातील. परंतु, स्टार्टअप्स आणि शहरांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निराकरणे सुधारण्यात मदत करतील. चॅलेंजची पहिली आवृत्ती डिजिटल इनोव्हेशनवर केंद्रित आहे. शहरे आणि स्टार्टअप्सना विविध उपाय विकसित करण्यासाठी आणि त्यांची चाचणी घेण्यासाठी, त्यांच्याकडून शिकण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतुकीवर लोकांचा विश्वास निर्माण करण्यासाठी आणि त्यांची गतिशीलता, प्रमाण वाढवण्यासाठी मार्गदर्शन मिळेल, असेही आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.