टेस्ला करणार देशातील सर्वात मोठी विदेशी गुंतवणूक

0
237

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) : जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार निर्माती कंपनी टेस्लानं भारतात गुंतवणुकीसाठी सुमारे 30 अब्ज डॉलर्स योजना तयार केली आहे. यासंदर्भात कंपनीची चर्चा सकारात्मक दिशेनं सुरू आहे. टेस्लानं भारतासाठी 5 वर्षांची गुंतवणूक योजना तयार केली आहे. केंद्र सरकारचं नवं ईव्ही धोरण लवकरच येणार असल्याची चर्चा आहे. टेस्ला सध्या नवं धोरण जाहीर होण्याची वाट पाहत आहे.

हिंदुस्तान टाईम्सनं सूत्रांचा हवाला देत वृत्त दिलं आहे की, जर टेस्लानं भारतात येण्याचा निर्णय घेतला, तर ती देशातील सर्वात मोठी विदेशी गुंतवणूक असेल. टेस्लाच्या प्रकल्पाशी संबंधित चर्चेत सहभागी असलेल्या सूत्रांनी सांगितलं की, टेस्ला आपल्या प्लांटमध्ये सुमारे 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. याशिवाय त्याच्या संलग्न कंपन्या भारतात सुमारे 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहेत. याशिवाय, बॅटरी विभागात सुमारे 5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होणार आहे, जी कालांतरानं सुमारे 15 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढेल. ते म्हणाले की आम्हाला पूर्ण आशा आहे की टेस्ला सुमारे 30 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल.

केंद्रातील मोदी सरकार ईव्ही धोरणाला अंतिम स्वरूप देण्यात व्यस्त आहे. हे धोरण टेस्लाला भारतात आणण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावेल. अहवालानुसार, नव्या धोरणात परदेशात बनवलेल्या ईव्हीवरील आयात शुल्क कमी केल्यास टेस्ला भारतात येण्याच्या आपल्या योजनांना गती देईल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टेस्ला आपली उत्पादित उत्पादनं आधी भारतात लाँच करू इच्छितं. तसेच, ते चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरवर देखील काम सुरू करणार आहे. त्यांना मेड इन इंडिया कार बनवायची आहे. यासाठी कारखाना उभारण्यासाठी सुमारे 3 वर्ष लागतील. कंपनी भारतातून ईव्ही कार निर्यात करण्यावरही भर देणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, टेस्लाचे मालक एलॉन मस्क पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चाहते आहेत. देशाला पुढे नेण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या प्रयत्नांचे मस्क भरभरुन कौतुक करतात. एलॉन मस्क आणि पंतप्रधान मोदी यांची गेल्या वर्षी जूनमध्ये न्यूयॉर्कमध्ये भेट झाली होती. त्यावेळी मस्क म्हणाले होते की, पंतप्रधान मोदींनी मला भारतात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. याचा मी गांभीर्यानं विचार करत आहे. मात्र, भारत सरकार देशात ईव्हीला प्रोत्साहन देत आहे. परंतु, कंपनीनुसार कोणतीही सवलत देण्यास तयार नाही.