कासारवाडी, दि. १७ (पीसीबी) – टेलिग्रामवर फसव्या पेजच्या माध्यमातून पैसे कमावण्याच्या बहाण्याने महिलेची दोन लाख ८५ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार कासारवाडी येथे उघडकीस आला. हा प्रकार ३ ते १६ मार्च या कालावधीत घडला.
याप्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेलिग्राम वरील अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना टेलिग्रामवरील फसव्या वेब पेजच्या माध्यमातून ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास आकर्षक पैसे कमावण्याचा विश्वास आरोपींनी दाखवला. त्यातून फिर्यादीकडून दोन लाख ८५ हजार रुपये घेऊन त्यांना कोणताही परतावा न देता तसेच गुंतवलेली रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.