टिळकांना उमेदवारी देतो, तुम्ही कसबा, चिंचवड बिनविरोध करणार का ?

0
164

पुणे, दि. ६ (पीसीबी) – भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर जाहीर झालेली पोटनिवडणूक महाविकास आघाडीने लढण्याचे ठरवले. त्यावर भाजपकडून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या जेष्ठ नेत्यांना फोन करून ही निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील यासंबधी पत्र लिहले. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक बिनविरोध करावी असं आवाहन केलं होतं.

निवडणूक बिनविरोध करण्याच्या या आवाहनानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हंटलं होतं की, जर मुक्ता टिळक यांच्या घरी ही उमेदवारी दिली असती तर बिनविरोध करण्याचा विचार केला असता. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपचे नेते आणि पुण्याचे पालकमंत्री यांनी चांगलंच समाचार घेतला आहे.

टिळकांना उमेदवारी देतो, तुम्ही निवडणूक बिनविरोध करता का? असा थेट प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी नाना पटोले यांना केला आहे. तर चिंचवडमध्ये घरातील उमेदवार दिला आहे मग तिथे का नाही बिनविरोध केली. आम्ही पुढच्या 48 तासात मुक्ता टिळक यांच्या घरात उमेदवारी दिली तर दोन्ही निवडणुका बिनविरोध करणार का असा सवालही पाटील यांनी यावेळी केला आहे.