“जीवनमूल्यांचे समग्र दर्शन कवितेतून घडते!” – राजन लाखे

0
355

पिंपरी,दि.२ (पीसीबी ) “जीवनमूल्यांचे समग्र दर्शन कवितेतून घडते!” असे विचार महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे यांनी प्रतिभा महाविद्यालय सभागृह, चिंचवड येथे शनिवार, दिनांक ०१ ऑक्टोबर २०२२ रोजी व्यक्त केले. कवयित्री सीमा गांधी लिखित ‘मनाचे सोहळे’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन करताना राजन लाखे बोलत होते. प्रा. चंद्रकांत वानखेडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तर प्रा.डॉ. अशोक पगारिया, पुरुषोत्तम सदाफुले, प्रा. सुरेखा कटारिया, वि. ग. सातपुते, डॉ. सुधीर हसमनीस, प्रकाशक गिरीश गांधी यांची व्यासपीठावर; तसेच साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रांतील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.

प्रा.डॉ. अशोक पगारिया यांनी, “मनातील जाणिवांचे प्रतिबिंब म्हणजे कविता होय!” असे मत व्यक्त केले; तर पुरुषोत्तम सदाफुले यांनी, “स्वतःचे तसेच समाजमनाचे सोहळे सीमा गांधी यांनी आपल्या कवितांमधून आविष्कृत केले आहेत!” असे निरीक्षण नोंदवले. प्रा. सुरेखा कटारिया यांनी, “‘मनाचे सोहळे’ या संग्रहात मानवता जोपासणारी कविता वाचायला मिळते!” असे गौरवोद्गार काढले. कवयित्री सीमा गांधी यांनी आपल्या मनोगतातून, “आईने वाचनसंस्कार केले. त्यामुळे साहित्याचा वारसा नसतानाही आयुष्याच्या वळणांवर शब्द भेटत गेले अन् साहित्यनिर्मिती झाली. पतीच्या प्रोत्साहनामुळे थांबलेला काव्यप्रवाह पूर्ववत झाला. माझ्या लेखनप्रवासात सर्व कुटुंबीयांचा मोलाचा वाटा आहे!” असे कृतज्ञतापूर्वक नमूद करून “मन समुद्र… समुद्र होते…” ही आपली आवडती कविता सादर केली.

याप्रसंगी मानसी चिटणीस (‘हिरवाईचा रंग’), हेमंत जोशी (‘निळाई’), सुनील अधाटे (‘परतीचा पाऊस’), रूपाली कर्डिले (‘चंद्र रोज हसतो आहे’) यांनी सीमा गांधी यांच्या कवितांचे अभिवाचन केले. सुलभा सत्तुरवार यांनी शुभेच्छा दिल्या. राजन लाखे पुढे म्हणाले की, “जाण, जाणीव, वेदना, संवेदना यांचे उत्कट प्रकटीकरण असलेल्या ‘मनाचे सोहळे’ या संग्रहात कवयित्रीने आपले मन पुरेपूर उतरवले आहे. प्रेम अन् सौंदर्याचा आविष्कार हे सीमा गांधी यांच्या कवितांचे वैशिष्ट्य असून आयुष्यातील अनुभवांची अनुभूती त्यांच्या कवितांमधून प्रतीत होते!” प्रा. चंद्रकांत वानखेडे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “जिद्द, चिकाटी अन् व्यासंग यांची फलनिष्पत्ती म्हणजे ‘मनाचे सोहळे’ हा कवितासंग्रह होय. जीवनातील सुख-दु:खाच्या प्रवासात दु:ख स्वतः पचवून सीमा गांधी यांची कविता सुखाची बरसात करते!” असे विचार मांडले. बाळासाहेब शेलोत, शिरीष गांधी, शांतीलाल गांधी, गिरीश गांधी, सचिन शेलोत यांनी संयोजनात परिश्रम घेतले. दीपप्रज्वलन आणि सरस्वतीपूजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. स्नेहल गांधी यांनी गणेशवंदना आणि सरस्वतीस्तवन सादर केले. भरत बारी यांनी सूत्रसंचालन केले. माउली खंडागळे यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.