जनाची नाही तर मनाची लाज बाळगा, शहर अतिरेक्यांच्या हातात सोपवू नका…! – थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
920

भ्रष्टाचाराच्या नशेतील काही राजकारणी आणि निर्लज्ज प्रशासन मिळून पिंपरी चिंचवडकरांचा कडोलोट करणार असे दिसते. आजवर कचऱ्यात पैसे खाल्ले, पाण्यात खाल्ले, अगदी सांडपाण्यातसुध्दा डुंबले. पाच वर्षांत दहा पिढ्या बसून खातील इतकी प्रचंड लूट केली. मांजर नव्हे तर हे रानबोके डोळे मिटून दूध पितात, त्यांना वाटते लोक झोपलेत. छत्रपतींचे नाव आणि ज्ञानोबा-तुकोबांची शपथ घेणारे हे लबाड… अफजलखान आणि मंबाजीचा वारसा चालवतात. गळ्यात माळ आणि पोटात काळ अशी ही कोडगी मंडळी आज थेट तुमच्या माझ्या जीवाशी खेळू पाहतात. गेली अनेक दशके नव्हे तर शतके हे शहर शांत, सुखी, समाधानी आणि सुरक्षित आहे. आता हे पांढरे बगळे शहर थेट दहशतवाद्यांच्या हातात द्यायला निघालेत. आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर या लोकांना हत्तीच्या पायी दिले असते किंवा रायगडाच्या टकमक टोकावरून कडेलोट केला असता. इतके गंभीर प्रकऱण आहे म्हणून जीव तुटतो. लोक हो, जागे व्हा आणि या ढोंगी, बदमाश, लबाडांचा कावा ओळखा. सावध व्हा आणि अशा निर्णयांना कडाडून विरोध करा.

पाकिस्तान आणि दुबईत कोणते बदमाश राहतात, काय करतात हे विस्कटून सांगण्याची गरज नाही. मुंबईत ज्या लोकांनी मृत्यूचे तांडव केले ते नाहीत पण त्यांची पिलावळ आता सोन्याची खान असलेल्या पिंपरी चिंचवड शहरावर टपून आहेत. या लोकांपासून किमान आपले शहर, राज्य आणि देश वाचवायला पाहिजे. काल परवा सकल हिंदू समाजाच्या मार्चात बेंबीच्या देठापासून `छत्रपती शिवाजी महाराज की…. जय…` करणारे दुसरीकडे जे लोक दुबई आणि पाकिस्तानातून आलेल्या फोनचे नेटवर्क चालवतात त्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ताब्यात आपल्या शहराचे इंटरनेट केबलचे जाळे सोपवू पाहतात, हे दुर्दैवी आहे. खूप मोठ्या भयंकर कटाचा हा भाग वाटतो. महापालिकेचे बथ्थड, भ्रष्ट प्रशासन झापडे लावून काम करत असल्याने त्यांनाही समज देण्याची वेळ आली आहे.

नेमके प्रकऱण काय आहे ते आपण पाहू. शहर आज ३० लाखाचे आहे ते २०४० मध्ये ६० लाख लोकसंख्येचे होणार आहे. जवळपास ८० टक्के लोकांकडे आज मोबाईल आहेत. आयटी मुळे घराघरात वायफाय, इंटरनेट सेवा आहे. देश विदेशातील वाहन निर्मिती कंपन्यांसाठी हे मोठे ठिकाण आहे. देशात सर्वाधिक मॉल ची उलाढाल, ऑन लाईन खरेदीत या शहराचा क्रम सर्वात वरचा आहे. दरवर्षी या शहरात किमान अडिच-तीन लाख कोटींची उलाढाल इथे होती असा अंदाज आहे. भविष्यात हे शहर दिल्ली, बेंगळूरु च्या तोडिचे असेल. त्यासाठीच इंटरनेट महाजाल इथे मोठे आहे. विविध कंपन्यां या कामासाठी वारंवार रस्ते खोदाई करत असतं म्हणून त्यावेळचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शक्कल लढवली. वारंवार खोदाई नको म्हणून कायमस्वरुपी डक्ट निर्माण करायचे ठरवले. शहर स्मार्ट, डिजीटल करायचे म्हणून तब्बल ७०० कोटी रुपये खर्चुन ६०० किलोमीटर अंतराच्या फायबर इंटरनेट केबलचे अंडरग्राऊंड जाळे टाकले. हेच डक्ट १० वर्षांसाठी भाडेतत्वार द्यायचे आणि त्यातून महापालिकेला कायमस्वरुपी महसूल मिळवायचा असेही ठरले. त्यासाठी सर्वाधिक रक्कम कोण देतो याच्या ऑफर्स मागविल्या. तीन कंपन्यांनी सहभाग घेतला आणि त्यात सुयोग टेलीमॅटिक्स – मे. फायबर स्टोरी कम्युनिकेशन्स प्रा. ली. ही भागीदार कंपनी सर्वोत्कृष्ठ ठरली. या पैकी सुयश नामांकित कंपनी आहे, पण फायबर स्टोरी कंपनीमध्ये रियाज अब्दुल अजीज शेख, ड्वेन मायकल परेरा, अश्रफ अली, आसिफ अजीज शेख व फिरदौस रियाज शेख, जबीन मुल्ला हे नामचीन या कंपनीचे भागीदार आहेत. अहमदाबाद मध्ये बनावट टेलिफोन एक्सचेंज चालवून दुबई, पाकिस्तान मधून आलेले सुमारे १२ लाख फोन आपल्या देशातील फोनमध्ये रुपांतरीत केल्याच्या कारस्थानात हे लोक आहेत. त्यामुळेच प्रकरण गंभीर आणि संशयास्पद आहे.

गुंतवणूक ७०० कोटींची, भाडे फक्त ३० कोटीं –
दहा वर्षांसाठी त्यांनी ३०० कोटी रुपये देऊ असे या कंपनीचा ऑफर आहे. म्हणजे वर्षाला ३० कोटी रुपये पालिकेला मिळणार. व्यावहारीक विचार केला तर ७०० कोटी रुपयेंची पालिकेची गुंतवणूक असल्याने १० वर्षांत किमान हजार कोटी रुपये महसूल मिळेल, असा अंदाज होता. व्याजाचा विचार केला तर एक प्रकारे फूकट सर्व नेटवर्क चालवायला द्यायचा हा आतबट्याचा व्यवहार आहे. कारण राजकारण्यांना कोट्यवधींचा मलिदा द्यावा लागतो. निविदा तयार कऱणारा आणि कंपनी सल्लागाराची भूमिकासुध्दा आता संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. याच कंपनीची ऑफर मंजूर व्हावी यासाठी निविदेत एक मेख मारुन ठेवली. पाच वर्षांचा कायदेशीर गुंता किंवा कोणतीही भानगड नसल्याची शाश्वती द्यायची असते, पण ती अटच निविदा तयार करणाऱ्यांनी काढून टाकली. सगळे कसे अगदी ठरवून झाले. दलालाची भूमिका बजावणाऱ्यांनी याच कंपनीची वकिली केली आणि काम फत्ते केले. प्रश्न महापालिकेला किती महसूल मिळणार याचाही नाही, तर ही संपूर्ण यंत्रणा ज्यांच्या ताब्यात जाणार त्यांची आजवरची पार्श्वभूमी महत्वाची आहे. मे. फायबर स्टोरी कम्युनिकेशन्स प्रा. चालवणाऱ्यांचे काळे धंदे. बनावट टेलिफोन इक्सचेंज चालवून आंतरराष्ट्रीय कॉल कन्वर्ट करण्याचे छुपे काम ही मंडळी करत होती. पाकिस्तान आणि दुबई येथील गुन्हेगारांच्या संपर्कात राहून या कंपनीचे संचालक हे देशद्रोही कृत्य करत होते. मोदींच्या गुजराथ राज्यातील अहमदाबाद येथे पोलिसांनी त्यांचा पर्दाफाश केला आणि बेड्या ठोकल्या. न्यायालयात हे प्रकरण सुरू आहे. दोन आरोपी सहा महिने जेलची हवा खाऊन पुन्हा उजळ माथ्याने वावरत आहेत. आता त्यांचे टार्गेट पिंपरी चिंचवड शहर आहे. कंपनीच्या माध्यमातून पूर्ण नेटवर्क ताब्यात घ्यायचा कट केला. त्या कटात आमचे भ्रष्ट, बथ्थड प्रशासन आणि लोकांच्या टाळूवरचे लोणी खाणारे राजकारणी बळी पडले. ऑफर देताना या कंपनीने आपले गुन्हेगारी कारनामे लपविले आणि झारितल्या शुक्राचार्यांनीही तिकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. आता स्मार्ट सिटीच्या बैठकित या कंपनीला काम देण्यासाठी स्वतः आयुक्त शेखर सिंह हेच विशेष आग्रही असल्याचे पाहून आणखी धक्का बसला. प्रश्न पैसे कोण किती खातो किंवा खाणार याचा नाही तर शहराच्या सुरक्षेचा आणि आमच्या जगण्या मराण्याचा आहे.

शहरात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांचा अड्डा करायचा का ? –
समजा विरोधाला न जुमानता या लाचखोरांनी हे काम गुन्हेगारांच्या कंपनीला दिलेच तर काय होणार हेसउध्दा जाणून घ्या. दहा वर्षे केबल नेटवर्क कंपनीच्या ताब्यात राहणार असल्याने पूर्वी प्रमाणे या लोकांनी दुबई, पाकिस्तानातले इंटरनेट कॉल कन्वर्ट केले तर… आज आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांनी पाकिस्तानवर कब्जा मिळवला आहे. भारत हा त्यांच्यासाठी मोठा दुष्मन आहे. पिंपरी चिंचवड शहर हे या लोकांसाठी गुन्हेगारी हालचालींसाठी मोठा तळ ठरू शकते. संपूर्ण नेटवर्क त्यांच्या ताब्यात गेल्यास घराघरात हे लोक डोकाऊ शकतात. पिंपरी चिंचवडकरांच्या प्रत्येक मोबाईल, लॉपटॉप मधून दहशतवादी डोकाऊ शकतात. डेटा चोरी होऊ शकते. महिला, मुलिंची इभ्रत, सुरक्षा संकटात येऊ शकते. इकडे लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या बंदीच्या नावाने शंख करायचा आणि दुसरीकडे आतून ही निच कृत्ये कऱणाऱ्यांशी हातमिळवणी करायची. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे सच्चे नेते, कार्यकर्ते देव, देश, धर्मासाठी घरदार आणि जीवाची पर्वा न करता दिवसाची रात्र करतात. आणि इकडे भाजपच्या तंबूत घुसलेले उंट या निष्ठावंतांना फाट्यावर मारून शहराचा आत्मघात करायला निघालेत. आजही तमाम जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गाढा विश्वास आहे. किमान त्यांनी असले तांदळातले खडे वेचून बाजुला केले पाहिजे अन्यथा या शहरात भाजप नाहक बदनाम होईल. प्रश्न कोणा व्यक्तीचा नाही तर प्रवृत्तीचा आहे. लोकहो, वेळ गेलेली नाही जागे व्हा. आता तरी हे कटकास्थान हाणून पाडा. तुमची पैशाची भूक भागविण्यासाठी आपले शहर दहशतवाद्यांच्या हातात सोपवू नका.