पुणे, दि. 1३ (पीसीबी) : राज्यातल्या बोगस औषधांचं लोण आता पुण्यातल्या ससून रुग्णालयातही पोहोचल्याची शंका वर्तवली जातेय. बीड जिल्ह्यातल्या बोगस औषध प्रकरणानंतर पुण्यातल्या ससून रुग्णालयातही त्याच पुरवठादाराकडून गोळ्या आल्याची माहिती आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून ज्या गोळ्या-औषधांबाबत तक्रार केली जातेय, त्यांचा वापर ससून रुग्णालयानं थांबवलाय. त्या सर्व औषधांची चाचणी एफडीएकडून झाल्यानंतरच त्या पुन्हा वापरात येतील, अशी माहिती ससूनच्या प्रमुखांनी दिलीय.
माहितीनुसार, ठेकेदाराकडून ससून हॉस्पिटलला डायक्लोफिनॅक, मीडिआझोलम, कॅल्शियम, डेक्सामिथसोन आणि मिझोप्रोस्टॉल ही औषधे पुरवली गेली होती. ही औषधे याआधी वापरण्यात आलीयत. उरलेल्या साठ्यात डायक्लोफिनॅकच्या ४०४० गोळ्या, मीडिआझोलमच्या १४४०, कॅल्शियम १२०, डेक्सामिथसोनच्या ५ हजार आणि मिसोप्रोस्टॉलच्या ७,५०० अशी औषधं शिल्लक होती. हा साठा वापरातून काढण्यात आला असून तपासणीसाठी पाठवला गेलाय.
नांदेडमध्ये 1 लाख 28 हजार गोळ्या सील
तिकडे नांदेडमध्येही बनावट औषध पुरवठा झाल्याचं उघड झाल्यानंतर सरकारी रुग्णालयातल्या 1 लाख 28 हजार गोळ्या सील करण्यात आल्या आहेत. धक्कादायक म्हणजे संबंधित रुग्णालयानं गोळ्या तपासणीसाठी ऑक्टोबर 2023 ला सरकारच्या लॅबमध्ये पाठवल्या होत्या. मात्र या गोळ्यांमध्ये आवश्यक ते घटक नाहीत याचा रिपोर्ट जवळपास वर्षभरानंतर प्राप्त झालाय. म्हणजे जगातली सर्वात मोठी महामारी असलेल्या कोरोनावर सुद्धा दीड वर्षात लस शोधली गेली. मात्र गोळ्यांमधले घटक योग्य आहेत की अयोग्य हे तपासायला 1 वर्षांचा कालावधी गेला.
धाराशीव जिल्ह्यातही मिस्थ्रल फॉर्मालेशन कंपनीच्या 14 हजार 790 गोळ्यांचा साठा सील करण्यात आलाय. महाराष्ट्रात बंदी केलेल्या पाच कंपन्या पैकी मिस्थ्रल फॉर्मालेशननं या गोळ्यांचा साठा केला होता. एक कंपनी 2023 ला तुळजापुरातल्या नवरात्र महोत्सवासात आरोग्य विभागानं महाआरोग्य शिबिर घेतलं होतं. त्यासाठी 27 जिल्ह्यातून ही औषधं मागवली गेली होती. ज्या बनावट कंपन्यांच्या नावानं महाराष्ट्रात औषध पुरवठा झाला त्यात म्रिस्टल फॉम्र्युलेशन, उत्तराखंड……रिफंट फार्मा, केरळ…….कॉम्युलेशन, आंध्र प्रदेश…. मेलवॉन बायोसायन्सेस, केरळ…. आणि एसएमएन लॅब, उत्तराखंड या कंपन्यांचा समावेश होता.
तक्रारीनंतर महाराष्ट्राच्या औषध विभागानं संबंधित राज्यांच्या वैद्यकीय यंत्रणाशी संपर्क केला. त्यात मिळालेल्या उत्तरात संबंधित पत्त्यावर अशा कोणत्याही कंपन्याच नसल्याचं समोर आलं. त्यामुळे या कंपन्यांच्या नावानं महाराष्ट्रात नेमकं कोण औषध देतं होतं? यामागचे मास्टरमाईंड कोण आहेत? हा प्रश्न अनुत्तरित आहे. बीडमधल्या बोगस औषधांचा साठा हा भिवंडीतल्या ॲक्वेटीस बायोटेक कंपनीकडून आला होता. यात मिहीर त्रिवेदी आणि द्विती त्रिवेदी या दोघांविरोधात गुन्हा नोंदवला गेला. यानंतर कुठून कुणाकडे औषधांचा पुरवठा झाला याची साखळी ही बीड, भिवंडी, मिरा रोड, सूरत ते थेट उत्तराखंडपर्यंत जावून पोहोचली. शेवटी जेव्हा उत्तराखंड सरकारच्या यंत्रणेला विचारणा झाली, तेव्हा त्या राज्यात औषध पुरवठा करणारी कंपनीच अस्तित्वात नसल्याचं उघडकीस आलं.
सरकारी रुग्णालयात मध्यमवर्गीय-गोरगरिब जनता जाते. डॉक्टरला देवदूत मानून त्यानं दिलेल्या गोळ्या-औषधी लोक डोळे झाकून घेतात. मात्र आपण रुग्णांना देतोय त्या गोळ्या खऱ्या आहेत की बनावट? हा प्रश्न सध्या अनेक सरकारी डॉक्टरांना पडलाय. त्यामुळे पूर्ण आरोग्य व्यवस्थेत संभ्रमाचं वातावरण निर्माण करणाऱ्या पापी लोकांना कुणाचं अभय होतं? इतके महिने बोगस गोळ्यांचा हा पुरवठा कुणाच्या आशीर्वादानं सुरु होता? याची उत्तरं सरकारला द्यावी लागणार आहेत.