मुंबई, दि. २६ (पीसीबी) – भाजपाने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये असं म्हणत आज संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपावर जोरदार टीका केली आहे. एवढंच नाही तर यासाठी त्यांनी पुन्हा एकदा बाबरी मशिद ज्या दिवशी पडली त्या दिवसाचा उल्लेख करत ते खास उदाहरण देत भाजपवर टीकेची तोफ डागली आहे. तसंच भाजपाने जे पोस्टर तयार केलं आहे त्यावरही संजय राऊत यांनी टीका केली आहे.
प्रभू रामाचे एकच व्हिआयपी भक्त आहेत ते म्हणजे नरेंद्र मोदी. प्रभू रामाचं बोट धरुन ते राम मंदिरात नेत आहेत असं पोस्टर भाजपाने छापलं आहे. जणू काही नरेंद्र मोदी हे विष्णूचा अवतार आहेत. हा भाजपाचा निर्लज्जपणा आहे. कोट्यवधी राम भक्तांच्या भावना दुखावणारं हे पोस्टर आहे. आम्ही सगळे सामान्य भक्त आहोत म्हणून आम्ही अयोध्येच्या लढ्यात उतरलो होतो. जेव्हा अयोध्येची लढाई सुरु होती तेव्हा हे व्हिआयपी भक्त आमचा काही संबंध नाही म्हणत काखा बगला वर करुन पळून गेले होते. अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
यापुढे संजय राऊत असं म्हणाले बाबरी आम्ही पाडली नाही असं काखा वर करुन हे सांगितलं आहे. त्यावेळी बाबरी पाडणारे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे अशी गर्जना बाळासाहेब ठाकरेंनी केली होती. बाबरी पाडल्याचं खापर ज्या भाजपाने घाबरुन डरपोकपणे शिवसेनेवर फोडलं. ती जबाबदारी बाळासाहेब ठाकरेंनी घेतली. तेव्हाच कळलं हिंदुत्वाच्या बाबतीत व्हिआयपी कोण आणि ढोंगी कोण? आत्ता यांना कंठ फुटला आहे. उद्धव ठाकरेंना कुणी निमंत्रण देण्याची गरज नाही. आम्ही तुमच्या आधीपासून अयोध्येत आहोत. अशोक सिंघल यांच्या बैठका मातोश्रीवर होत होत्या.
आज त्यांना जो इव्हेंट त्यांना करायचा करु द्या.. विष्णूचे तेरावे अवतार जे भाजपाने जाहीर केलेत जे प्रभू रामाला हात धरुन मंदिरात नेत आहेत हे तुमचं हिंदुत्व आहे का? २०२४ नंतर कुणाचं हिंदुत्व आहे ते सगळ्यांना समजेल. हे सगळे डरपोक बाबरीचे घुमट कोसळल्यावर जे पळून गेले त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. त्यांना तेव्हा घाम फुटला, ते म्हणू लागले की हे आमचं कृत्य नाही. तेव्हा ती छाताडं, तुमची हिंमत सगळं कुठे गेलं होतं? असाही प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. बाळासाहेब ठाकरेंनी त्या लढ्याची जबाबदारी घेतली होती. त्यावेळी त्यांची मनगटं आणि छाती पिचली होती. आता आम्हाला सत्तेचा माज दाखवू नका. आम्ही कोणत्याही स्वार्थाशिवाय या लढ्यात उतरली होती. ज्यांनी हिंदुत्वाच्या मैदानातून पलायन केलं त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे