चोरीच्या उद्देशाने वृद्ध महिलेचा खून

0
398

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) : छताचे सिमेंटचे पत्रे फोडून घरात घुसलेल्या चोरट्याने वृद्ध महिलेचा खून केला. तसेच घरातील एक लाखाचे दागिने चोरून नेले. ही घटना पिंपरी येथे 31 जुलै रोजी उघडकीस आली. तब्बल आठवडाभराने पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी एका महिलेने शनिवारी (दि. 5) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जुलै रोजी रात्री साडेदहा ते 31 जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या दरम्यान सॅनिटरी चाळ, पिंपरी येथे एका 85 वर्षीय महिलेच्या घरात छताचे सिमेंट पत्रे तोडून आरोपी चोरटा आत शिरला. त्याने मयत महिलेच्या डोक्‍यात कठीण वस्तूने प्रहार करून तिला जीवे ठार मारले. तिच्या अंगावरील तसेच घरातल्या कपाटातील चार तोळे वजनाचे एक लाख चार हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व मोबाइल फोन जबरदस्तीने चोरी करून नेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.