चिमुकलीसमोर आयटी अभियंता बापानेच आईला संपवले

0
429

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडमध्ये उच्चशिक्षित तरुणाने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिवम पंकज पचौरी उर्फ भारद्वाज (वय- ३२) याला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अवंतीका शर्मा (वय- ३०) असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. आरोपी शिवम हा दररोज मद्यपान करून पत्नीला मारहाण करायचा यातूनच टोकाचं पाऊल उचलत पत्नीचा खून केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आरोपी शिवम याने नुकतीच आयटी कंपनीतील नोकरी सोडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवम हा उच्चशिक्षित असून त्याने अलीकडेच आयटी कंपनीतील नोकरी सोडली होती. तो सध्या बेरोजगार होता. तो दररोज मद्यपान करून पत्नीला मारहाण करायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली. पती पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वादही व्हायचे. दोघांना तीन वर्षांची मुलगी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी शिवम मद्यपान करून घरी आला होता. त्यानंतर त्याचा पत्नी अवंतीकासोबत वाद झाला. वाद इतका टोकाला गेला की आरोपी पती शिवम याने पत्नी अवंतीकाच डोकं अगोदर भिंतीवर मग किचनवर आपटले. खाली पडल्यानंतर तिचा गळा आवळून खून केला. घरात तीन वर्षांची चिमुकली होती. तिच्यासमोरच तिच्या आईला वडिलांनी ठार केले. या घटनेनंतर स्वतः च शिवमने पोलीस कंट्रोलला फोन करून घटनेची माहिती दिली. आरोपी शिवमला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे हे करत आहेत.