चिन्हा’बाबत बोलणार नाही, मात्र युतीच्या माध्यमातूनच निवडणूक लढविणार – श्रीरंग बारणे

0
254

पिंपरी दि. २६ (पीसीबी) – शिवसेना पक्ष चिन्हाचा वाद निवडणूक आयोग, न्यायालयात आहे. येत्या काही दिवसात पक्ष चिन्हाचा वाद मिटेल. चिन्हही मिळेल. 2024 अद्याप लांब आहे. चिन्हाबाबत अधिक बोलणार नाही, मात्र मी शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातूनच 2024 ची लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत सांगितले. मावळच्या जागेबाबत केंद्रीय गृहमंत्री, भाजप नेते अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या बैठकीत निर्णय झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, पिंपरीच्या महिला संघटिका सरिता साने, माजी नगरसेवक निलेश बारणे, माजी नगरसेविका विमल जगताप, निलेश हाके, बशीर सुतार, देहूगावचे शहरप्रमुख सुनील हगवणे आदी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सरकार राज्यात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत. मावळ लोकसभा मतदारसंघातील बहुतांश पदाधिकारी सक्रियपणे शिंदे साहेबांसोबत आहोत. 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातून मी निवडून आलो. शिवसैनिकांसोबत भाजपच्याही कार्यकर्त्यांनी माझे काम केले. त्यांच्यामुळेच मी 8 वर्षे देशाच्या लोकसभेत मावळवासीयांचे प्रतिनिधीत्व करत आहे. केंद्र, राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचवत आहे.

राज्यात राजकीय घडामोडी घडत असतानाही सर्वजण एकत्र राहू, शिवसेना-भाजप युती राहिली पाहिजे, अशी भूमिका आम्ही घेतली होती. परंतु, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचा निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही आमचा निर्णय घेतला. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करत आहोत. आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष संघटना बांधणीसाठी प्रत्येकावर जबाबदारी सोपविली जाईल. महापालिका निवडणूक भाजपसोबत लढविणार आहोत. त्याबाबत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे. स्थानिक नेत्यांसोबत चर्चा करुन निवडणूक रणनितीबाबत चर्चा केली जाईल. मुख्यमंत्री शिंदे शहरात येतील. कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. आजपर्यंत पालिकेतील चुकीच्या कामाला पाठिंबा दिला नाही. पाठिशी घातले नाही. आता ही चुकीची कामे रोखली जातील, असेही खासदार बारणे यांनी सांगितले.