चिंचवड पोटनिवडणुकिचा निकाल अंदाज –

0
522

पोलिस गुप्तचर म्हणतात, अश्विनीताई जगताप, पण सट्टाबाजार सांगतो नाना काटे

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – राज्यातील राजकीय घडामोडी आणि आगामी महापालिका निवडणुकिमुळे चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे. भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. पुणे शहरात माजी महापौर मुक्ता टीळक यांच्या निधनामुळे कसबा विधानसभा आणि इकडे चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुकांकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. निवडणूक प्रचार संपायला अवघे ७२ तास बाकी असून मतदान २६ फेब्रुवारी आणि निकाल २ मार्च रोजी आहे. दरम्यान, चिंचवड पोटनिवडणुकिबाबत नेमके काय होऊ शकते याचे काही प्राथमिक अंदाज समोर आले आहेत.

पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणे प्रमाणे महाआघाडीचे उमेदवार नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यातील मतविभागणीचा फायदा आपसूकच भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना होईल आणि त्या मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असे भाकित वर्तविले आहे. दुसरीकडे ज्यांचे अंदाज अगदी १०१ टक्के खरे समजले जातात त्या सट्टा बाजाराने नाना काटे यांना हिरवा सिग्नल दिला आहे.

आजवर लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांसाठी सट्टा बाजारचे अंदाज हेच प्रमाण समजले जातात. पोलिस यंत्रणेचे अंदाज स्थानिक खबरे, पत्रकार आणि राजकीय कार्यकर्ते यांच्या चर्चेतून येत असतात. पूर्वी पोलिसांचे अंदाज तंतोतंत खरे असतं. राज्य सरकार आणि प्रशासनसुध्दा पोलिस गुप्तचरांच्या अंदाजानुसारच काम करत असे. अनेकदा ते अंदाज चुकल्याचे आढळले किंवा अवास्तव असल्याचेही आढळले. त्यामुळे पोलिसांच्या सर्वेक्षणात अचुकता नसल्याचे लक्षात आले.

पिंपरी चिंचवड पोलिस गुप्तचर यंत्रणेकडून अधिकृतपणे कोणतेही अंदाज सांगितले नाहीत, पण सुत्रांच्या माहितीनुसार चिंचवड पोटनिवडणुकित भाजप बाजी मारणार असे संकेत आहेत. अश्विनी जगताप यांना सहानुभूती मोठ्या प्रमाणावर आहे, तसेच मोदी फॅक्टर अद्याप कार्यरत असल्याने त्याचाही फायदा होण्याची शक्यता वर्तविली आहे. जगताप यांची लढत ही नाना काटे यांच्या बरोबच असेल. अपक्ष राहुल कलाटे हे प्रचारात खूप मोठ्या प्रमाणात आघाडीवर असताना पोलिसांच्या मते ते तिसऱ्या क्रमांकावर असू शकतात.

सट्टा बाजारात कोणाला किती दर –
सट्टा बाजारात निव्वळ पैशाचा व्यवहार चालतो हे सर्वश्रृत आहे. जिंकणाऱ्या उमेदवाराला सर्वात कमी दर असतो. त्यानुसार सुरवातीला जगताप यांच्याबाबतीत विजयाचा अंदाज बांधणाऱ्या सट्टा बाजाराचा कल आता राष्ट्रवादीचे नाना काटे यांच्या बाजुने झुकलेला आहे. काटे यांना ००.२२ पैसे असा सर्वात कमी दर आहे. त्यांच्या खालोखाल भाजपच्या बलाढ्या उमेदवार अश्विनी जगताप यांना ००.४८ पैसे, तर शिवसेनेचे बंडखोर अपक्ष राहुल कलाटे यांना १.५० रुपये दर असल्याचे सांगण्यात येते. प्रचार बंद होण्यासाठी दोन दिवस (शुक्रवार,२४ फेब्रुवारी) सायंकाळी पाच पर्यंतची, तर मतदानासाठी अद्याप चार दिवास म्हणजे रविवार (२६ फेब्रुवारी)चा अवधी आहे. दरम्यान गेले दहा दिवस जो प्रचार आणि वातावरण निर्मिती झाली त्यानुसार हे अंदाज आहेत. अंतिम टप्प्यातील हे अंदाज असले तरी कोणत्याही घटना किंवा प्रसांगामुळेसुध्दा पोलिस किंवा सट्टा बाजारचे अंदाज बदलू शकतात.