चिंचवडमध्ये भाजप उमेदवारीचा घोळ, राष्ट्रवादी आणि शिवसेना इच्छुक लागले तयारीला

0
474

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकित भाजपची उमेदवारी दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी की धाकटे बंधू शंकर यांना द्यायची यावर घरात एकमत होत नसल्याची चर्चा आहे. दरम्यान, भाजपमधील उमेदवारीचा वाद वाढणार आहे, असे दिसू लागताच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या इच्छुकांनी थेट तयारी सुरू केल्याने बिनविरोधचा विषय आता हळूहळू मागे पडत चालला आहे.

पोटनिवडणुकिची घोषणा होताच भाजपमधून बिनविरोधच्या बातम्या पेरण्यात आल्या. प्रत्यक्षात पंढरपूर, कोल्हापूर, मुंबईच्या पोटनिवडणुकित भाजपने उमेदवार दिला होता आणि ही परंपरा खंडीत केली. तिथे राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर मिनतवाऱ्या करायची वेळ आली होती. आता भाजपवर ती वेळ आल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेना एकण्याच्या तयारीत नाहीत. जगताप कुटुंबातून शंकर जगताप यांचे नाव चर्चेत येताच इच्छुकांनी मोठी उचल खालली असून थेट संपर्क, बैठकांना सुरवात केली आहे.

भाजप आणि रा.स्व.संघातून तसेच पिंपळे गुरवच्या रहिवाशांमधूनही आश्विनी जगताप यांना उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा आहे. प्रत्यक्षात शंकर जगताप यांचेच नाव कुटुंबातून पुढे रेटण्याचा प्रयत्न सुरू असल्याने गोंधळ वाढला आहे. रात्री मोठ्या संख्येने गावकरी आणि आमदार जगताप यांचे समर्थक जगताप यांच्या निवासस्थानी जमले होते. पत्नी म्हणून सहानुभूती आश्विनी यांना आहे, शंकर यांना नाही, असे अगदी स्पष्ट शब्दांत काही लोकांनी भावना व्यक्त केल्या आहेत. इतकेच नाही तर भाजपने आश्विनी यांना उमेदवारी दिलीच तर शंकर जगताप हे वेगळा पवित्रा घेऊ शकतात, अशीही चर्चा रंगल्याने ही पोटनिवडणूक आता सरळ होईल, असे दिसत नाही.

उमेदवारीचा घोळ सुरू असल्याने भाजप कार्यकर्त्यांच्या पोटात गोळा आला आहे. कारण इथेच घोळ झाला तर पुढचे गणित कठिण होणार असून कदाचित आगामी महापालिकेलासुध्दा त्याचा मोठा फटका बसू शकतो. चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक ही महापालिका निवडणुकिसाठी रंगीत तालिम असणार आहे. आता आमदार जगताप यांच्या इतका धोरणी, मुरब्बी, सर्वगूणसंपन्न एकही नेता समोर नाही. भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे यांनी यापूर्वी कधीही भोसरी वगळता पिंपरी अथवा चिंचवड मतदारसंघात लक्ष घातले नाही. त्यामुळे विरोधकांना कशा पध्दतीने तोंड द्यायची याची कोणतीही व्युहरचना तयार नाही. मागच्या तीन निवडणुकांचे मतदान पाहता केवळ स्वतः लक्ष्मण जगताप होते म्हणून लोकांनी भरभरून मते दिली. २०१९ च्या निवडणुकित सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी मिळून राहुल कलाटे यांना पुढे केल्याने तब्बल १ लाख १२ हजार इतकी लक्षवेधी मते विरोधकांना मिळाली होती. मतांचा तो फरक पाहिल्यावर या पोटनिवडणुकित पुन्हा महाआघाडी म्हणून एकच उमेदवार समोर आला तर भाजपलो सोपे नाही, अशी चर्चा आताच सुरू आहे.

नवनाथ जगताप यांचे नाव राष्ट्रवादीकडून –
राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य इच्छुकांमध्ये भाऊसाहेब भोईर, नाना काटे, मोरेश्वर भोंडवे यांच्या नावाबरोबरच आता जगताप यांच्या कट्टर समर्थकांपैकी जेष्ठ नगरसेवक नवनाथ जगताप यांचेही नाव पुढे आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भाजपने शंकर जगताप यांना उमेदवारी दिली तर आपण निश्चित लढणारच, असा निर्धार स्वतः नवनाथ जगताप व्यक्त करत असल्याने वातावरण बदलले आहे. महापालिकेत पुन्हा राष्ट्रवादीच सत्ता आणायची म्हणून चिंचवड पोटनिवडणूक स्वतः अजित पवार यांच्यासाठी आता प्रतिष्ठेची आहे. भोईर, काटे, भोडवे हे तीनही ताकदिचे इच्छुक चाचपणी करून थेट तयारीला लागले आहेत.

शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी आतापर्यंत जगताप यांच्या विरोधात २०१४ आणि २०१९ अशा दोन निवडणुका लढविल्या आहेत. आता ही लढाई निर्णायकी असल्याने कलाटे यांचेच नाव शिवसेनेतून निश्चित केले जाण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या वाटाघाटीत महाआघाडी म्हणूनच निवडणूक लढविण्याचा निर्धार राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस पक्षांनी आजच पत्रकार परिषदेत जाहीर केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कसबा आणि चिंचवड महाआघाडी लढणार असल्याचे सुतोवाच केल्याने भाजपला बिनविरोध देण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाल्यात जमा आहे. आता भाजपचा उमेदवार कोण असणार यावर महाआघाडीचे पुढचे गणित अवलंबून आहे