चिंचवडचा निकाल बोलका, राष्ट्रवादीला खूप मोठी संधी | थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
331

गल्ली ते दिल्ली सत्तेसाठी `वाट्टेल ते` असा खाक्याच भाजपने अवलंबला आहे. ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स असे सगळे सगळे वापरले. लोकशाहिचे चारही स्तंभ अक्षरशः वाकवले. प्रशासकीय यंत्रणा खिश्यात ठेवली. न्यायालयेसुध्दा आपलीशी केली. माध्यमांचे मालक-चालक विकत घेतले. राज्यात शिवसेना हा सर्वात मोठा अडथळा म्हणून शिवसेनेच्या घराचे वासे फिरवले आणि घरसुध्दा पार मोडीत काढलं. भाजप विरोधात बोलणाऱ्यांची बोलती बंद करण्यासाठी अनेकांच्या पायात साखळदंड घातले. तमाम लोक या घडामोडींक़े उघड्या डोळ्यांनी पाहतात आणि वेळ आली की बरोबर काम दाखवतात.
कसबा विधानसभा पोटनिवडणूक निकाल हे त्याचे जाज्वल उदाहरण. चिंचवडमध्येसुध्दा भाजप उमेदवाराच्या विरोधातील मतांची गोळाबेरीज बरेच काही सांगून जाते. अवघ्या एक वर्षांच्या कालावधीसाठी या फक्त दोन पोटनिवडणुकांसाठी तब्बल १०० कोटींवर खैरात केली. पोलिसांची ताकद वापरली. मतांचा अक्षरशः बाजार मांडला. कसब्यात तर गणेश मंडळांना दोन दोन किलो चांदी आणि मोठ मोठ्या देणग्यांचा मलिदा वाटला. घरघरात प्रत्येक मताला ३ हजाराप्रमाणे हिशेब करुण भगव्या रंगाची पाकिटे टाकली. विरोधकांच्या तंबूतसुध्दा साप सोडून दिले. मीडियातील रथीमहारथींना घरपोच लाख लाखाचे बक्षिस पाठवले. खुद्द सीएम-डिसीएमसह सात-आठ मंत्रीगण दिवसरात्र तळ ठोकून होते. इतके सगळे होऊनसुध्दा लोकांनी आपले मतदान रविंद्र धंगेकर यांच्या पारड्यात टाकले. ब्राम्हण नाराज झाले तसेच मुस्लिम, ख्रिश्चन संतापले होते त्याचे प्रत्यंतर निकालातून आले. आम्ही विकाऊ नाही, तर स्वाभिमानी आहोत, याचा साक्षात्कार पुणेकरांनी दिला. प्रसंगी मरायला टेकलेल्या म्हात्याऱ्या काँग्रेसच्या उमेदवाराला मत देऊ, पण सत्तेच्या दलालांना नाही असा इशाराच पुणेकर जनतेने दिला. महाराष्ट्रातील सामान्य जनतेचे प्रातिनिधीक मत कसबाच्या निकालात होते, असे म्हटल्यास वावगे ठरु नये. जे कसब्याचे तेच चिंचवडचे.

पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे `कमबॅक` सहज शक्य –
पुणे शहरातील कसबा हा भाजपसाठी ४४० व्होल्टचा झटका होता, तर पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड पोटनिवडणूक निकाल ही तंबी होती. भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना प्रचंड मोठी सहानुभूती मिळाल्याने त्यांचा विजय सुकर झाला. इथेही मतांसाठी किमान ३५ कोटींची खैरात केल्याची चर्चा आहे. विरोधक एक राहिले तर भाजपचा पाडाव सहज शक्य होतो, ते राज्यातील नागपूर, अमरावती, नाशिक शिक्षक आणि पदवीधर निवडणुकित दिसले. तोच कित्ता कसबा पोटनिवडणुकित गिरवला म्हणून महाआघाडी जिंकली. ५ लाख ६९ हजार मतदारांपौकी २ लाख ८७ हजार मतदान झाले. त्यात

भाजपच्या अश्विनी जगताप यांना १ लाख ३५ हजार, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांना ९९ हजार मते मिळाली. जगताप या ३८ हजार मतांनी जिंकल्या. काटे आणि शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे यांना ४४ हजार मतांची गोळाबेरीज केली तर ती १ लाख ४३ हजार होते. भाजप विरोधकांची ताकद बरोबरीत होती आणि आजही कायम आहे. फक्त भट्टी जमली नाही अन्यथा इथेही कसब्यासारखाच निकाल लागला असता. जर तर ला फारसे महत्व नाही, पण राष्ट्रवादीने जोर लावला तर आगामी काळ भाजपसाठी प्रचंड खडतर असेल, असे ठामपणे सांगता येईल.

२००९ पासूनच्या विधानसभा, लोकसभा मतांचे गणित पाहिले तर भाजपचा आलेख घसरता आहे. २००९ मध्ये विरोधकांमध्ये फूट पाडण्यात आमदार जगताप यांना यश मिळाली म्हणून ते केवळ सहा हजारांनी विजयी झाले होते. पुढे २०१४ मध्ये ६० हजार मतांनी जगताप जिंकले, पण त्यांना १ लाख १२ हजार मते होती आणि त्यांचे विरोधक नाना काटे, राहुल कलाटे, मोरेश्वर भोंडवे यांना मिळून १ लाख १९ हजार मते मिळाली होती. साम, दाम, दंड, भेद हे तंत्र जगताप यांना जितके साधले तितके एकाही विरोधकाला जमले नाही, हेसुध्दा मान्य करावे लागेल. २०१९ मध्ये जगताप यांनी दीड लाख मते घेतली आणि ३८ हजरांनी विजयश्री खेचून आणली. त्यावेळी जगतापांच्या सर्व विरोधकांनी मिळून राहुल कलाटे यांना ताकद दिली होती म्हणून त्यांना १ लाख १२ हजार इतकी भरघोस मते मिळाली. आता जगताप हयात नसताना भाजपला श्रीमती जगताप यांच्यासाठी मोठी पळापळ करावी लागली. सहानुभूतीची लाट असूनही पैशाच प्रचंड वारेमाप वापर करावा लागला. विरोधकांचे समिकरण मोडीत काढण्यासाठी कलाटे यांच्यासारखा मातब्बर उमेदवारसुध्दा कायम रिंगणात राहावा म्हणून खुद्द मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना सूत्रसंचलन करावे लागले. राष्ट्रवादीला नेहमी साथ देणारे पॉकेटस लक्ष्मीदर्शन करून फोडावे लागले. मामुर्डी, किवळे, रावेत पासून थेट पिंपळे गुरव, सौदागर, सांगवी, नवी सांगवी अशी टापूनिहाय कोणाला किती मते मिळाली हा तक्कात पाहिला तर काटे यांना मिळालेली लाखभर मते राष्ट्रवादीला लढण्याची ताकद देणारी आहेत. भाजपला आत्मपरिक्षण करायला लावणारा हा निकाल आहे. महापालिकेतील १२८ पैकी ५५ नगरसेवक चिंचवड विधानसभा कार्यक्षेत्रात असून तब्बल ३६ भाजपचे असूनही अपेक्षेप्रमाणे मते श्रीमती जगताप यांना मिळालेली नाहीत. जिथे भाजपचे पूर्ण पॅनल जिंकले त्या ठिकाणी चार नगरसेवक असूनही नाना काटे यांची मते लक्षवेधी ठरतात. पैशाने काळेवाडी, रहाटणी खरेदी केली, पण तिथेही बरोबरीत मते आहेत. रा.स्व.संघाचा बालेकिल्ला असलेल्या चिंचवडगावात ब्राम्हणांसह ओबीसी, मागासवर्गीयांची मते राष्ट्रवादी आणि प्रसंगी कलाटे यांच्या पारड्यात पडल्याचे दिसते. समिकरण उलटे होऊ शकते, अशी स्थिती आहे. उद्याच्याला महापालिका निवडणूक लागलीच तर जिथे भाजपला ३६ जागा मिळाल्या तोच आकडा कदाचित राष्ट्रवादीकडे झुकलेला असेल.

राष्ट्रवादीची कचखाऊ भूमिका –
महापालिकेतील पाच वर्षांत भाजपने केलेल्या भ्रष्टाचाराची शेकडो प्रकरणे चव्हाट्यावर आली. पाच हजार हाऊसिंग सोसायट्यांचा पाणी प्रश्न, टँकर लॉबीचे वर्चस्व, अतिक्रमणे, स्मार्ट सिटीमधील निकृष्ट कामे आणि भ्रष्टाचार असे शेकडो मुद्दे राष्ट्रवादीकडे होते. शास्तीकर सरसकट पूर्णतः माफीचा आदेश आता निकालानंतर काढला, पण या विषयाशी संबंधीत लाखभर मतदार या मतदारसंघात असताना त्यावर चकार शब्द राष्ट्रवादीने काढला नाही. अवैध बांधकामे नियमीत करण्याचे पोकळ आश्वासनावर मतदार नाराज होता, पण तो मुद्दासुध्दा राष्ट्रवादीने म्हणावा असा जोरकसपणे प्रचारात आणला नाही. शहरातील इंटरनेट केबलचे जाळे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांशी संबंधीत कंपनीकडे सोपविण्याचा भाजप धार्जिण्या प्रशासनाचा निर्णय हा लोकांना अपिल होणारा मुद्दा होता, पण त्याचे एक ओळसुध्दा प्रचारात आली नाही. भामा आसखेड जँकवेल प्रकरणात ३० कोटी रुपयांचे भ्रष्टाचाराचा मुद्दा मागे राष्ट्रवादीने मांडला, पण नंतर प्रचारात कच खाल्ली. अजित पवार यांनी शहराचा विकास केला हे सर्वांना ज्ञात आहे, पण पाच वर्षांत भाजपने काय केले याचा जाब विचारायला सुध्दा राष्ट्रवादी कमी प़डली. भाजपच्या काळातच स्थायी समिती अध्यक्षाला लाचप्रकऱणात जेलवारी झाली, पण गावकी भावकीत पाहुणा आडवा आल्याने तो अत्यंत प्रभावी मुद्दा सुध्दा राष्ट्रवादीचे प्रचारक विसरले. भाजपकडे नाही अशी भरभक्कम ताकदवान नेत्यांची फळी राष्ट्रवादीकडे आहे, पण तेसुध्दा अंग झटकून काम करताना दिसले नाहीत. अजित पवार आता झाडाझडती घेण्याची गरज आहे. महापालिका आणि पुढे येणाऱ्या विधासभा, लोकसभा घ्यायच्या असतील तर राष्ट्रवादीसाठी ही आता शेवटची संधी असेल. पुन्हा कचखाऊ भूमिका घेतलीच तर संपलेच म्हणून समजा.

भाजप गटबाजीने पूरता पोखरलेला –
भोसरीकर आमदार महेश लांडगे यांना आमदार जगताप यांचे वर्चस्व कधीच मान्य नव्हते आणि आतासुध्दा त्यांना ते नको होते. भामा आसखेड धरणातील जॅकवेल प्रकरणात ३० कोटींचा भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप खुद्द जगताप यांनीच केला होता आणि आमदार लांडगे यांची अक्षरशः झोप उडाली होती. जगताप आणि लांडगे यांचे दोन स्वतंत्र गट आजही कायम आहेत. पाच वर्षांत एकही पद न दिलेल्या काही प्रमुख भाजप नगरसेवकांनीसुध्दा काटे किंवा कलाटे यांचे काम केले. अश्विनी जगताप यांच्या विरोधात काम केल्याचे तसेच दिलेली रसद शेवटच्या घटकापर्यंत पोहचली नसल्याची धुसफूस समोर आली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या मुख्य प्रवक्त्याने चांगले नियोजन केले असा अभिप्राय देताच, जगताप कुटुंबियांनी त्या पदाधिकाऱ्याचा पाढा वाचला आणि सर्वांसमोर उध्दार केल्याची वदंता आहे. खुद्द जगताप कुटुंबात शंकर जगताप आणि अश्विनी जगताप यांच्या समर्थकांचे दोन स्वतंत्र तंबू असल्याची मोठी चर्चा आहे. या घडामोडीत नाराज २५ नगरसेवक आता पुन्हा राष्ट्रवादीकडे तोंड फिरवून बसले, अशीही बातमी आहे. ज्यांनी प्रामाणिकपणे काम केलेले नाही त्यांचा पत्ता कट होणार, अशी तंबी दिल्याने नगरसेवकांची अर्धी फौज भेदरलेली आहे. ज्यांच्या प्रभागात भाजपला कमी मते मिळालीत त्यांनी गाशा गुंडाळायला आताच सुरवात केली. थोडक्यात भाजपचे संघटन आतून पुरते पोखरलेले आहे.