चांदखेड गोळीबार प्रकरणातील आरोपींना अटक

0
246

चांदखेड, दि.१२ (पीसीबी) -मावळ तालुक्यातील चांदखेड येथे यात्रेमध्ये घुसून एका टोळक्याने दहशत निर्माण केली. तमाशाच्या तंबूत कोयत्याने तोडफोड करत गोळीबारही केला. ही घटना मंगळवारी (दि. १०) सायंकाळी घडली. या घटनेतील पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अविनाश बाळासाहेब गोठे (वय २२), विजय अशोक खंडागळे (वय १८, दोघे रा. चांदखेड), अमर उत्तम शिंदे (वय २२), मनीष शिवचरण यादव (वय २०, दोघे रा. परंदवडी, ता. मावळ), अनिकेत अनिल पवार (वय २६, रा. पवारनगर, थेरगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक नवनाथ धायगुडे यांनी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी चांदखेड गावात यात्रा होती. यात्रेनिमित्त गावात तमाशा आणि इतर उत्सव सुरु होता. सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास आरोपी कोयते आणि पिस्टल घेऊन आले. मोठमोठ्याने आरडाओरडा करत आरोपींनी यात्रेत उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडल्या. तमाशाच्या तंबूत जाऊन आरोपींनी लोखंडी पेट्यावर कोयत्याने मारून नुकसान केले. यात्रेचे फ्लेक्स फाडले. अविनाश गोठे याने त्याच्याकडे असलेल्या पिस्टल मधून लोकांच्या दिशेने दोन राउंड फायर केले. त्यानंतर गर्दीचा फायदा घेऊन आरोपी पळून गेले. शिरगाव परंदवडी पोलिसांनी औंध मधून आरोपींना अटक केली.