– मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदी आशीष शेलार
मुंबई, दि. १२ (पीसीबी) – भारतीय जनता पार्टीचे नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून माजी उर्जा मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.चंद्रशेखर बावनकुळे आता भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमले गेले आहेत. याआधी चंद्रकांत पाटील हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होते. याबरोबरच मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदी आशीष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी या निवडीचं पत्रक प्रसिद्ध केलं आहे.
कामगार नेते ते ऊर्जामंत्री…
“राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रवासही खडतर आहे. सुरवातीला कोराडी ते नागपूर या मार्गावर बावनकुळे रिक्षा चालवायचे. त्यानंतर कोराडी मधील कोराडी महाऔष्णिक विद्युत केंद्रातील लहान मोठे कंत्राट घेऊन त्यांनी कंत्राटदार म्हणून काम सुरु केले.
“औष्णिक वीज केंद्रात कंत्राटदार म्हणून काम करतांना प्रकल्पातील कंत्राटी कामगारांचे प्रश्न ते उचलू लागले. पुढे त्यांनी स्वतःची ओळख कोराडी औष्णिक वीज केंद्रातील कामगार नेते म्हणून तयार केली,” असं नागपूरमधील वरिष्ठ पत्रकार प्रवीण मुधोळकर सांगतात.
मुधोळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “कामगार आंदोलनातूनच त्यांना नितीन गडकरी यांच्यासाखे मार्गदर्शक लाभले आणि त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. बावनकुळे राजकारणात जेव्हा नवखे होते तेव्हा महाराष्ट्रात भाजपचं एवढं प्रस्थ नव्हतं. पण तरी ही त्यांनी गडकरींच्या नेतृत्वाखाली काम करायला सुरुवात केली.
“दरम्यान जिल्हा परिषदेच्या निवडणूका लागल्या. बावनकुळेंना भाजपने उमेदवारी दिली. त्यांनीही संधीच सोनं केलं आणि ते निवडून आले. त्यावेळी जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता होती. ही निवडणूक त्यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरली. जिल्हा परिषदेतील सर्वाधिक सक्रिय सदस्य म्हणून अल्पावधीतच त्यांना प्रसिद्धी मिळाली.
“पुढे जेव्हा विधानसभेच्या निवडणूका लागल्या तेव्हा कामठी विधानसभा मतदारसंघासाठी इतर पक्षांकडून रिंगणात तगडे उमेदवार देण्यात आले होते. काँग्रेसने दिग्गज नेते मुकुल वासनिक यांना उमेदवारी दिली. तर तत्कालीन आमदार व राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत बहुजन रिपब्लिकन एकता मंच नावाचा पक्ष स्थापन करून निवडणुकीत उडी घेतली.
“भाजपकडे फारसे तगडे उमेदवार नव्हते. तेव्हा बड्या नेत्यांच्या लढाईत बावनकुळे यांना भाजपने उतरवले. त्यावेळी बावनकुळेंना डमी उमेदवार म्हणून हिणवलं गेलं मात्र त्यांनीच विजयाचं निशाण रोवलं. तेव्हापासून त्यांनी सलग तीन निवडणुका जिंकल्या.भाजपची सत्ता येताच मंत्रिपदाचा कुठलाही अनुभव नसताना त्यांना ऊर्जा खात्याचे कॅबिनेट मंत्री करण्यात आलं,” मुधोळकर सांगतात.











































