चंदीगड येथे पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचा “प्रशंसा प्रमाणपत्र” देवून सन्मान

0
318

पिंपरी, दि. २९ (पीसीबी): पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडला चंदीगड येथे नुकत्याच संपन्न झालेल्या “स्मार्ट सिटीज सीईओ कॉन्फरन्स ऑन डेटा अँड टेक्नॉलॉजी” मध्ये इंडिया अर्बन डेटा एक्सचेंज (IUDX) द्वारे प्रशंसा प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. स्मार्ट सिटी मिशनचे सहसचिव आणि मिशन संचालक कुणाल कुमार यांच्या हस्ते मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी प्रमाणपत्र स्विकारले.

स्थानिक विभाग, सरकारी संस्था, नागरिक आणि कॉर्पोरेट क्षेत्र यांच्यातील माहितीच्या देवाण-घेवाणीला प्रोत्साहन देण्यासाठी इंडिया अर्बन डेटा एक्सचेंज (IUDX) नेटवर्कमध्ये 35 शहरांपैकी पिंपरी चिंचवड शहराने (PCMC) सहभाग घेतला आहे. या माध्यमातून नागरिक आणि प्रशासनासाठी डेटा वापराद्वारे प्रदान केलेले मूल्य प्रदर्शित करण्यासाठी वापर प्रकरणांची विस्तृत श्रेणी (घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण सेन्सर, नागरिक तक्रार, नागरिक सुरक्षा) स्थापित केले गेले आहे. त्याद्वारे माहिती संकलीत करून केंद्र शासनाकडे पाठविण्यात येत आहे.

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (MoHUA) ने इंडिया अर्बन डेटा एक्सचेंज (IUDX) सुरू केले आहे. यामाध्यमातून सर्व प्रकारच्या सुलभ आणि सुरक्षित डेटा शेअरिंग सक्षम करण्यासाठी पूर्णपणे मुक्त-स्रोत क्लाउड-आधारित प्लॅटफॉर्म विकसित करण्यात येत आहेत, त्यामध्ये महापालिकामार्फत उत्तम कामगीरी करण्यात येत आहे, अशी प्रतिक्रीया आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे. या कामगिरीबाबत महापालिकेच्या सर्व विभागांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

इंडिया अर्बन डेटा एक्सचेंज च्या माध्यमातून शहरांना जटिल शहरी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, शहरी क्षेत्रातील सर्व घटकांमध्ये एकात्मिक विकास स्थापित करण्यासाठी आणि त्यांना नवकल्पनाच्या पुढील टप्प्यावर नेण्यात मदत करीत आहे. इंडिया अर्बन डेटा एक्सचेंज हे पूर्णपणे मुक्त स्रोत आहे. जे ओपन स्टँडर्ड एपीआय, डेटा मॉडेल्स आणि सुरक्षा, गोपनीयता आणि लेखाविषयक दृष्टिकोनाच्या अंतर्निहित फ्रेमवर्कवर बनवलेले आहे. त्यास संपूर्ण डिजिटल इकोसिस्टम मध्ये सहजपणे स्वीकारता येणार आहे.