जयपूरच्या विश्वकर्मामध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. एका घराला लागलेल्या भीषण आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. विश्वकर्माच्या जैसल्या गावात घडलेल्या या घटनेत तीन निष्पाप मुलांसह संपूर्ण कुटुंबाचा होरपळून मृत्यू झाला आहे. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. सर्व मृत बिहारचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. मधुबनी बिहारमधील एक कुटुंब जैसल्या गावात भाड्याने राहत होते. घरातील सर्व सदस्य झोपले असताना रात्री घराला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. लोकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. आगीपासून वाचण्यासाठी सर्वजण एका कोपऱ्यात गेले. मात्र,या दुर्घटनेत घरातील ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शेजाऱ्यांकडून माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला होता.
अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी जळालेले मृतदेह बाहेर काढले. या सर्वांना पोस्टमॉर्टमसाठी एसएमएस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. एफएसएलच्या टीमनेही घटनास्थळी पोहोचून तपास केला आहे. आगीचे कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, ‘विश्वकर्मा, जयपूर येथे लागलेल्या भीषण आगीमुळे 5 नागरिकांच्या अकाली मृत्यूची बातमी हृदयद्रावक आहे. मी देवाकडे प्रार्थना करतो, या भीषण दुर्घटनेतील मृतांच्या आत्म्यांना शांती मिळो आणि कुटुंबातील सदस्यांना या परिस्थितीतून जाण्याची शक्ती मिळो. त्याचबरोबर जखमी लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करतो. जखमींना योग्य उपचार सुविधा देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.