गोवा काँग्रेस मुक्त होणार ?

0
250

पणजी दि. १० (पीसीबी)- गोव्यात काँग्रेसला मोठा जबरदस्त धक्का बसला आहे. गोव्यातील काँग्रेसचे बडे नेते दिगंबर कामत यांच्यासह आठ आमदार आज भाजपमध्ये  प्रवेश करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. गोव्यात काँग्रेसकडे 11 आमदार आहेत. त्यापैकी आठ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने गोवा काँग्रेस मुक्त होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे आमदार फुटणार असल्याने काँग्रेसचं विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदही धोक्यात आलं आहे. भाजपने या आमदारांना मंत्रिपद देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळेच या आमदारांनी बंड करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या एका आमदारांने याबाबतची माहिती दिली आहे. तर कोलकाता येथेही काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे तीन विद्यमान आणि तीन माजी खासदार टीएमसीच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे काँग्रेससाठी हा आठवडा धक्क्याचा असणार असल्याचं सांगितलं जात आहे.

माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि विरोधी पक्षनेते मायरल लोबो यांच्यासह आठ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. भाजपच्या हायकमांडनेही या आमदारांना पक्षात घेण्यास हिरवा कंदिल दाखवला आहे. अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी हे आठही आमदार एकत्रितपणे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गोवा विधानसभेची सदस्यसंख्या 40 आहे. काँग्रेसकडे 11, भाजपकडे 20, एमजीपीकडे दोन आणि तीन अपक्ष आमदार आहेत. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आज संध्याकाळी तातडीने गोव्याला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
2024ची तयारी

दरम्यान, राज्यातील काँग्रेस आमदारांना पक्षात घेण्यास भाजपचा एक गट इच्छुक नसल्याचंही सांगितलं जातं. मात्र, 2024च्या लोकसभा निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेता जात आहे. कारण 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला दक्षिण गोव्यातून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे यावेळी त्याचं उट्टं काढण्यासाठी या आमदारांना पक्षात घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जातं. दरम्यान, मला या प्रवेशाबाबतची काहीच माहिती नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंत तनावडे यांनी सांगितलं.