भोसरी, दि. २० मे (पीसीबी) – पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पिंपरी चिंचवड पोलिसांची करडी नजर आहे. भोसरी पोलीस ठाण्यात स्थापन केलेल्या सोशल मीडिया सेलने सोशल मीडियावरील माहितीच्या आधारे एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक केली. त्याने विरोधी टोळीतल्या सदस्यांना मारण्यासाठी बाळगलेला कोयता पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 18) सायंकाळी मोहन नगर भोसरी येथे करण्यात आली आहे.
शफिक सुलतान शेख (वय 23, रा. भोसरी. मूळ रा. लातूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भोसरी पोलिसांनी पोलीस रेकॉर्ड वरील गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी सोशल मीडिया सेल स्थापन केला आहे. या सेलच्या माध्यमातून गुन्हेगारांचे सोशल मीडिया अकाउंट सातत्याने तपासले जातात. भोसरी पोलीस ठाण्यातील सोशल मीडिया सेल रेकॉर्ड वरील गुन्हेगारांचे सोशल मीडिया अकाउंट तपासत असताना दोन टोळ्यांमध्ये वैमनस्य असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी शफिक शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला आहे. शफिक शेख याचा भोसरी येथील गुन्हेगारांची वाद झाल्याने त्याचा बदला घेण्यासाठी त्याने हत्यार बाळगले असल्याचे पोलीस तपासात सांगितले.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनायककुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त विवेक पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलीस उपनिरीक्षक मुकेश मोहारे, सहाय्यक फौजदार राकेश बोयणे, पोलीस अंमलदार सचिन गारडे, नवनाथ पोटे, धोंडीराम केंद्रे, सागर जाधव, तुषार दराडे, आशिष गोपी, प्रतिभा मुळे, संतोष महाडिक, स्वामी नरवडे, अनिकेत पाटोळे, ज्ञानेश्वर साळवे यांच्या पथकाने केली आहे.