गुजरातच्या ठेकेदारांचीच पिंपरी चिंचवडमध्ये चलती…

0
465

तब्बल १५०० हजार कोटींची कामे गुजरातकडे

पिंपरी,दि.०६(पीसीबी) – देशात आणि राज्यातच नव्हे तर पिंपरी चिंचवड शहरातसुध्दा भाजपची सत्ता आल्यापासून शेकडो कोटींची कामे केवळ गुजराथी ठेकेदारांनाच कशी मिळतात हा आता संशोधनाचा विषय झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरात पूर्वी बहुसंख्य मराठी, स्थानिक आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातील कंत्राटदार होते. प्रकल्पांसाठी कुठलाही सल्लागार नियुक्ती असेल तर तिथेसुध्दा शक्यतो मराठी मनाचाच विचार होत असे. अलिकडे म्हणजे २०१७ मध्ये शहरात भाजपची एकहाती सत्ता आली आणि सारे चित्र बदलले. धक्कादायक म्हणजे या शहराची अस्मिता असलेल्या भूमिपुत्र आमदार, खासदार, नगरसेवकांनी आजवर त्याबाबत कधी अवाक्षरही काढलेले नाही.

शहरातील रस्ते, पूल, उड्डाणपूल, पाणी पुरवठा, ड्रेनेज, पंतप्रधान आवास योजना, झोपडपट्टी पुर्नवसनासह असंख्य कामांत गुजराथ मध्ये राहणाऱ्या कंपन्याच पात्र होतात. आज रोजी सुमारे दीड-दोन हजार कोटी रुपयांची विविध कामे गुजराथ मधील कंपन्यांना दिल्याचे समोर आले आहे. महापालिकेत भाजपची सत्ता होती आणि सत्ताधाऱ्यांनीसुध्दा आदेशाचे तंतोतंत पालन केल्याने जणू शहरच अंदान दिल्याचे चित्र आहे.

गुजराथच्या ठेकेदार कंपन्यांना पिंपरी चिंचवडमध्ये लाल पायघड्या अंथरल्या जातात. तिथे कोणाचे लागेबांधे आहेत ते अद्याप समोर आलेले नाही, मात्र परिस्थिती संशयास्पद आहे. सर्वोत्कृष्ट उद्हारण म्हणून या शहराचा विकास आराखडा (डिपी) बनविण्याचे काम तीन वर्षांपूर्वी एका गुजराथी कंपनीला देण्यात आले. मेसर्स हसमुख सी. पटेल अर्थात एचसीपी या कंपनीला शहराच्या १७७ चौरस किलोमीटरचा डिपी तयार कऱण्याचे कामाचा आदेश २०१९ मध्ये महापालिका आयुक्तांनी दिला. त्यासाठी सुमारे १५ कोटी रुपये खर्च आहे. शहराचा १९९७ मध्ये विस्तार झाला त्यावेळी उपग्रहामार्फत अद्यावत
डिपी तयार करण्याचे काम टाटा कन्सलटंन्सी ला दिले होते.

पंतप्रधान आवास योजना हा शहरातील दुसरा सर्वात मोठा प्रकल्प. आर्थिक दुर्बल घटकांसाठी सुमारे दहा हजार घरांचे हे अत्यंत महत्वाकांक्षी असे काम. रावेत येथील प्रकल्पात न्यायालयीन दावा असल्याने ते अद्याप सुरू नाही, मात्र अन्य ठिकाणी या योजनेतंर्गत काम वेगात सुरू आहे. पिंपरीतील स्वप्ननगरी – नेहरूनगर येथील ५२ कोटींचे तसेच मोहननगर येथील ३१ कोटी रुपये खर्चाचे अशी दोन्ही कामे मेसर्स नटवर कन्स्ट्रक्शन कंपनी, अहमदाबाद यांना देण्यात आले. डुडुळगाव येथे ५६८ घरांचे सुमारे १६७ कोटी रुपयांचे कामसुध्दा गुजराथ स्थित कंपनी शांती कनस्ट्रक्शन यांना देण्यात आले आणि ते आता पूर्णत्वाला आले आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात पवना, इंद्रायणी, मुळा, मुठा या नद्यांचा सुधार प्रकल्प हा अत्यंत प्रतिष्ठेचा विषय आहे. केंद्र सरकार त्यासाठी ५० टक्के तर राज्य सरकार २५ टक्के अनुदान देणार आहे. या कामासाठी महाराष्ट्रात शेकडो तज्ञ असताना सल्लागार मिळाला तोसुध्दा गुजराथचाच. पिंपरी चिंचवड शहराचा विकास आराखडा कऱण्यासाठी जे काम करतात त्याच हसमुख पी, पटेल अर्थात एचसीपी कंपनीकडे आहे. डिझाईन अन्ड मॅनेजमेंट सल्लागार म्हणून ही कंपनीच मार्गदर्शन करत आहे. देशातील तमाम नदी संवर्धन प्रकल्पांसाठी पुणे शहरातून सल्लामसलत घेतली जाते, पण पवना, इंद्रायणी, मुळा, मुठा साठी गुजराथकडे जायची वेळ का आली तो चर्चाचा विषय आहे.

पिंपरी चिंचवड शहरात प्राधिकऱणाच्या पेठ क्रमांक १२ मध्ये गोरगरिबांसाठी तब्बल ५,५०० घरांचा प्रकल्प उभा करण्यात आला. आजच त्यांचे ताबे देण्याचे काम सुरू झाले. पण या सुमारे ४०० कोटींच्या कामाचा ठेकासुध्दा अहमदाबादच्या नटवर आणि शांती कन्ट्रकशन कंपनीकडेच होते.

शहराला पाणी पुरवठा भामा आसखेड धरणातून १६७ एमएलडीचे पाणी उचलायचे आहे. इथे जॅकवेलसह सर्व काम सुमारे १७६ कोटींचे आहे. या कामासाठी ठेकादार पेपरवर मेसर्स गोंडवाना कन्स्ट्रक्शन कंपनी कंपनीकडे आहे. चिखली येथे नुकताच सुरू कऱण्यात आलेल्या जलशुध्दीकरण प्रकल्पाचे बांधकाम तसेच दहा वर्षांसाठी देखभाल दुरुस्तीचे काम ८५ कोटींचे गोंडवाना कन्स्ट्रक्शन कंपनीकडेच आहे. या कंपनीचा पत्ता नागपूरचा आहे, पण कंपनीचे दोघे मुख्य भागीदार संचालक हे मूळचे अहमदाबादचेच रहिवासी आहेत. कंपनी नोंदणी कार्यालयातील त्यांचा रहिवासी पत्ता अहमदाबादचाच आहे.

सुमारे दीड लाख रोजगार देणारी फोक्सव्हॅगन कंपनी तळेगावची गुजराथला गेली म्हणून मोदी-शाह यांना टार्गेट करणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील शेकडो कोटींची कामे गुजराथी ठेकेदारांकडेच कशी जातात याची चौकशी करावी वाटत नाही. मुंबईतील मार्केट गुजराथला चालले, बंदर मुंबईतून कांडला पोर्टकडे जाणार, शेअर बाजार सुरतला जाणार, हिरे कारखाने सुरतकडे गेला आहे. अशा प्रकारे महाराष्ट्रातून गुंतवणूक, रोजगार जात असातनाच एकडची शेकडो कोटींची विकास कामेसुध्दा गुजराथी कंपन्यांच्याच हातात कशी जातात हा आता संशोधाचा विषय झाला आहे.