गाढवं पाळण्यासाठी नोकरी सोडली; आता करतोय लाखोंची कमाई

0
300

देश,दि.१४(पीसीबी) – भरपूर शिकून चांगल्या पगाराची नोकरी मिळवायची असं प्रत्येकाचं स्वप्नं असतं. हल्ली तरी बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी मिळवणं हे अनेकांसाठी स्वप्न असतं. मात्र अशाच एका गलेलठ्ठ पगारी नोकरी एका व्यक्तीने सोडली. बरं यामागील कारणही अगदी मजेशीर वाटेल पण या व्यक्तीने गाढवं पाळण्यासाठी नोकरी सोडलीय. माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून गाढवांचं संगोपन करणाऱ्या या व्यक्तीला आता या डाँकी फार्मिंगमधून चांगलाच नफा होतोय. या व्यक्तीचं नाव आहे श्रीनिवास गौडा. श्रीनिवास हा कर्नाटकचा रहिवाशी असून त्याने राज्यातील पहिलं डाँकी फार्म सुरु केलंय.

४२ वर्षीय श्रीनिवास गौडा यांनी घेतलेल्या या विचित्र निर्णयाची सध्या देशभरामध्ये चर्चा आहे. नुकतचं म्हणजे आठ जून रोजी श्रीनिवासने कन्नड जिल्ह्यामधील एका गावामध्ये गाढवांसाठीचं डाँकी फार्ममधून प्रोडक्ट्सची विक्री सुरु केली आहे. हे कर्नाटकमधील अशाप्रकारे गाढवांसाठी उभारण्यात आलेलं पहिलं केंद्र आहे. देशाचा विचार केल्यास अशाप्रकारचं हे देशातील दुसरं केंद्र असून यापूर्वी केरळमधील एर्नाकुलममध्ये गाढवांसाठी एक फार्म सुरु करण्यात आलंय. सामान्यपणे केवळ हमाली किंवा सामान वाहून नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गाढवांच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई करण्यास सुरुवात केलीय.

पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर श्रीनिवास एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करायचा. त्यानंतर त्याने नोकरी सोडली आणि २०२० मध्ये इरा गावात २.३ एकरच्या जमिनीवर गाढवांचं संगोपन केंद्र सुरु केलं. पूर्वी याच जमिनीवर श्रीनिवास शेती करायचा आणि काही पाळीव प्राणी पाळायचा. सध्या या ठिकाणी ससे, कोंबड्या आणि २० गाढवं आहेत.

गाढवं शोधण्यासाठी मला फार कष्ट घ्यावे लागले असं श्रीनिवास म्हणाला. गाढवं आता फार कोणी वापरत नाही, त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने गाढवं शोधणं जरा कठीण गेलं असं श्रीनिवास सांगतो. चांगल्या पगाराची नोकरी सोडून अशाप्रकारे गाढवं पाळण्याचा निर्णय घेणाऱ्या श्रीनिवासची सुरुवातीला अनेकांनी खिल्ली उडवली. मात्र गाढविणीच्या दुधाला चांगली किंमत मिळते आणि त्याला चांगली मागणी असल्याचं श्रीनिवासला ठाऊक होतं. त्यामुळेच खिल्ली उडवणाऱ्यांकडे लक्ष न देता त्याने स्वत:चं काम सुरु ठेवलं.

श्रीनिवासने दिलेल्या माहितीनुसार गाढविणीचं दूध हे फारच उत्तम दर्जाचं, महाग आणि औषधी असतं. आता हे दूध एक प्रोडक्ट म्हणून बाजारात आणण्याचा श्रीनिवासचा विचार आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण गाढवाचं ३० मिलीलीटर दूध हे १५० रुपयांना मिळतं. श्रीनिवास आता या दुधाचं योग्य पॅकेजिंग करुन मॉल्स, दुकाने आणि सुपरमार्केटमध्ये पुरवठा करणार. सौंदर्यप्रसादनांमध्येही या दुधाचा वापर केला जातो. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार श्रीनिवासला आतापर्यंत १७ लाख रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. अवघ्या काही कालावधीमध्ये त्याला गाढविणीच्या दुधासाठी एवढी मोठी ऑर्डर मिळाल्याने त्याचा हा नोकरी सोडून गाढवांंच संगोपन करण्याचा निर्णय योग्य असल्याची चर्चा पंचक्रोशीत सुरु झालीय.