Videsh

खलिस्तानवाद्यांनी लंडनमध्ये भारतीय ध्वज खाली खेचला

By PCB Author

March 20, 2023

लंडन, दि. २० (पीसीबी) – लंडनमधल्या भारतीय उच्चायुक्तालयातून भारतीय ध्वज खाली खेचल्याने परराष्ट्र मंत्रालयाने काल संध्याकाळी उशीरा दिल्लीतल्या ब्रिटनच्या वरीष्ठ अधिकाऱ्याला समन्स बजावलं आहे. फुटीरतावादी अमृतपाल सिंग याच्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ खलिस्तान समर्थकांनी ध्वज खाली खेचला. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

मंत्रालयाने उच्चायुक्तालयातल्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल तीव्र शब्दात सुनावलं आहे. भारतीय अधिकारी आणि राजदूतांबद्दल ब्रिटनची उदासीन भूमिका अस्वीकारार्ह असल्याचंही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. काल सायंकाळपासून या कारवाईला विरोध सुरू झाला. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या सेलफोन व्हिडिओंमध्ये निदर्शक इमारतीवर चढताना आणि भारताचा ध्वज उतरवताना दिसत आहेत.

“या घटकांना हाय कमिशनच्या आवारात प्रवेश करण्याची परवानगी देणार्‍या ब्रिटिश सुरक्षेच्या पूर्ण अनुपस्थितीबद्दल स्पष्टीकरण मागितले गेले. व्हिएन्ना कन्व्हेन्शन अंतर्गत यूके सरकारच्या मूलभूत कर्तव्यांची आठवण करून देण्यात आली,” असे परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.