गहुंजे, दि. २८ (पीसीबी) – क्रिकेट मॅचवर बेटिंग सुरु असलेल्या ठिकाणी दरोडा विरोधी पथकाने छापा मारून कारवाई करत चौघांना अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि. 26) रात्री पावणे दहा वाजता लोढा बेलमोंडो सोसायटी येथे करण्यात आली.
दुर्गेश बजरंगलाल पारीख (वय 35), शिवदान शक्ती सिंग (वय 31), सावरिया गिरिधारीलाल प्रजापती (वय 21), ओमप्रकाश धनाराम चौधरी (वय 30, सर्व रा. लोढा बेलमोंडो सोसायटी, ता. मावळ. मूळ रा. राजस्थान) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार नितीन लोखंडे यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोढा बेलमोंडो सोसायटी मध्ये 28 नंबर बिल्डींग मध्ये क्रिकेट सामन्यांवर बेटिंग घेतली जात असल्याची माहिती दरोडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार नितीन लोखंडे यांना मिळाली. त्यानुसार दरोडा विरोधी पथकाने शुक्रवारी रात्री छापा मारून कारवाई केली.
आरोपींनी स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे सीमकार्ड खरेदी केले आहेत. केंद्र सरकारने बंदी घातलेला बेटिंग व्यवसाय चालविण्यासाठी आरोपींनी त्या सिमकार्डचा वापर केला. नागरिकांकडून ऑनलाईन माध्यमातून बेटिंग घेतली. तसेच नागरिकांनी गुंतवलेल्या पैशांच्या बदल्यात तेवढ्या रकमेचे आयडी आणि पासवर्ड बनवून दिले असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. आरोपींनी क्रिकेट सामन्यांवर बेटिंग घेऊन अवैध मार्गाने काळ्या पैशाची आर्थिक उलाढाल करत शासनाची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.