पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने क्रांतिवीर चापेकर बंधुंच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य अभिवादन फेरी, ‘दि प्लॅन’ नाटकाच्या प्रयोगासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, कार्यवाह ॲड. सतिश गोरडे, सहकार्यवाह रवी नामदे यांनी दिली.
16 एप्रिल रोजी जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने चापेकर वाड्यात सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत रक्तदान शिबिर पार पडणार आहे. 17 एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता अभिवादन फेरी काढण्यात येणार आहे. गुरुकुलम, केशवनगर शाळा, काकडे पार्क, श्री शिवाजी उदय मंडळ, प्रदिप स्वीट्स, पावर हाऊस चौक, क्रांतिवीर चापेकर चौक, गांधी पेठ मार्गे चापेकर वाडा असा फेरीचा मार्ग असणार आहे. या फेरीत भारमातेचा चित्ररथ, 500 फुट तिरंगा, रँडचा वध केलेला देखावा, चापेकर बंधुंवरील 5 चित्ररथ, मुलींचे ढोल-ताशा पथक, मर्दाने खेळांचे प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहेत.
तर, 18 एप्रिल रोजी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सायंकाळी पाच वाजल्यापासून विविध कार्यक्रम होणार आहेत. राजमाता जिजाऊ यांचे वंशज समीर जाधवराव, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते, हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे वंशज सत्यशील राजगुरू यांचा सत्कार करण्यात येणार आहे. विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री शंकर गायकर यांचे मार्गदर्शन होणार आहे. त्यानंतर ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमण आणि त्यांच्या सहकलाकरांचे रँड आणि जॅक्सन यांच्या वधाची कहाणी सांगणा-या ‘द प्लॅन’ या नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत. या कार्यक्रमांना शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन चापेकर स्मारक समितीच्या वतीने करण्यात आले.