कोट्यवधी खर्चुनही शहरात तुबाई कशी – नाना काटे

0
288

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कोट्यावधी रुपयांचा टॅक्स गोळा होत असताना शहरातील रस्त्यावर ठिकठिकाणी पाण्याची तळी निर्माण का होत आहेत. महानगरपालिका रंगरंगोटी करण्यावरती करोड रुपये खर्च करते. मात्र, अवकाळी पावसामुळे शहरातील अनेक भागात रस्त्यावरतीच पाणी का साचले जात आहे. अनेक सखल भागात रस्त्यावर ओढ्याचे स्वरूप प्राप्त का होतेय असा सवाल माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्त शेखर सिंह यांना निवेदनाद्वारे विचारला आहे.

मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरात अनेक सखल भागात ठिकठिकाणी पाणी साठले जात आहे. पावसाळापूर्वी शहरातील प्रमुख नाले, ओढे, गटारे, स्ट्रॉंम वॉटरच्या लाईन यांची साफसफाई होणे अपेक्षित असतानाही प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अद्याप ती अपूर्ण झालेली दिसत आहे. त्यामुळे अवकाळी पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचल्याचे प्रकार प्रसिद्धी माध्यमातून समोर आले आहेत.

या घटनेमुळे कामगार वर्ग व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेकडे करोडो रुपयांचा टॅक्स भरत असताना सामान्य नागरिकांसाठी महापालिकेने तातडीने सुविधा देणे अपेक्षित आहे. महापालिकेची अनेक भागात खोदकाम सुरू असल्याने वीजपुरवठाही खंडित होत आहे. तर पावसाच्या पाण्याला योग्य तऱ्हेने प्रवाहित न केल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावरती पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप आल्याचे दिसून आले आहे. तरी महापालिकेने शहरातील सर्व गटारे आणि नाले तातडीने स्वच्छ करावेत. तसेच शहरातील ज्या भागात पाणी साचले जाते. त्याठिकाणी महापालिकेने तातडीने उपाययोजना करण्यात यावेत असे नाना काटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.