Pune

कॉसमॉस बँकेचे संचालक मुकूंंद अभ्यंकर यांना सहा महिन्यांचा कारावास

By PCB Author

May 30, 2023

पुणे, दि. ३० (पीसीबी) – कॉसमॉस बँकेचे सलग 43 वर्ष संचालक असणारे 86 वर्षीय डायरेक्टर मुकूंद लक्ष्मण अभ्यंकर (रा. मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर यांना भरधाव वेगात चारचाकी चालवून दुचाकीस्वार महिलेस धडक देवून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी 6 महिने साध्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.के. दुगांवकर यांनी हा निर्णय दिला आहे. दरम्यान, दंडाची रक्कम न भरल्यास 1 महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल असे न्यायालयाच्या आदेशात नमुद करण्यात आले आहे. डेक्कन पोलिस स्टेशनच्या हद्दीतील भांडारकर रस्त्यावरील अभ्युदय बँकेसमोर दि. 17 जुलै 2016 रोजी दुपारच्या सुमारास मुकूंद अभ्यंकर यांनी चारचाकी चालवित असताना अरूंधती गिरीश हसबनीस (29, रा. नर्‍हे) यांना जबर ठोस दिली होती. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अरूंधती यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी विक्रम सुशिल धूत (35, रा. शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली होती. त्यावेळी हे अपघात प्रकरण प्रचंड गाजले होते. अभ्यंकर यांना पोलिसांनी अटक देखील केली होती. दरम्यान, सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. गिरीश बारगजे यांनी खटल्याचे काम पाहिले तर बचाव पक्षाच्या वतीने अ‍ॅड. ऋषिकेश गानू यांनी युक्तिवाद केला. दरम्यान, न्यायालयाने अभ्यंकर यांना शिक्षा सुनावली आहे. अलीप करण्यासाठी अभ्यंकर यांना न्यायालयाने मुभा दिली आहे. सध्या अभ्यंकर यांनी अपिल करण्यासाठी जामिन घेतला आहे. डेक्कन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विपीन हसबनीस, पोलिस निरीक्षक (गुन्हे) शकील पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक खानेकर, पोलिस हवालदार काकडे, पोलिस नाईक भुवड आणि पोलिस नाईक मोरे यांनी खटल्याचे कामकाज पाहिले.