कॉमेडियन राजू श्रीवास्तव काळाच्या पडद्याआड; वयाच्या 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

0
363

दिल्ली दि. २१ (पीसीबी) :दिग्गज कॉमेडियन म्हणून ओळखले जाणारे राजू श्रीवास्तव यांचं निधन झालं. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होती. परंतु आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

कॉमेडियन राजू श्रीवास्तव जवळपास एका महिन्याहून अधिक काळ रुग्णालयात दाखल करण्यात होते. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. १० ऑगस्टपासून राजू श्रीवास्तव यांना दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी त्यांची अँजिओप्लास्टी झाली होती.

राजू श्रीवास्तव यांनी ‘टी टाइम मनोरंजन’ या टीव्ही शोमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. दूरदर्शनवरील शोमध्ये राजू, सुरेश मेनन आणि ब्रजेश हिरजी यांसारख्या कलाकारांसोबत स्टेज शेअर करताना दिसले. २००५ मध्ये ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या स्टँड-अप कॉमेडी शोच्या पहिल्या सीझनमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी केली, ज्यामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली.’मैने प्यार किया’, ‘बाजीगर’, ‘बॉम्बे टू गोवा’चा रिमेक आणि ‘आमदानी अथनी खर्चा रुपैया’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला.

“राजू श्रीवास्तव यांच्यासोबत अनेक आठवणी आहेत. ते आमचे गुरू होते. ही जी बातमी आली त्याबाबत विचारही केला नव्हता. कलाकारांवर त्यांचं प्रेम होतं. ते सर्वांचा आदर करायचे. ज्युनिअर्सशीही त्यांचा खुप स्नेह होता. प्रत्येकाशी भेटून त्यांची विचारपूस, मदत करण्याचं काम त्यांनी केली. आमच्या क्षेत्रात त्यांनी खुप काम केलंय. त्यांनी या क्षेत्राला सन्मान मिळवून दिला,” अशी प्रतिक्रिया राजू श्रीवास्तव यांचे मित्र सुनील पाल यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

राजू श्रीवास्तव यांच्या निधनानं खुप दुख झालंय. ज्यानं संपूर्ण देशाला हसवलं त्यांनीच आज रडवलंय. सर्वच जण त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते. अनेक दिवसांपर्यंत त्यांनी संघर्ष केला. आज माझ्याकडे शब्दच नाहीयेत. ते कोणत्याही स्ट्रगरला पाहायचे तेव्हा विचारपूस करायचे, जेवण केलं का नाही याची विचारपूस करायचे. कोणालाही त्रास झालेलं त्यांना पाहावत नव्हतं. त्यांनी अनेकांचं भलं केलं. त्यामुळेच अनेकांच्या प्रार्थना त्यांच्यासोबत होत्या, अशी प्रतिक्रिया त्यांचे सोबती एहसान कुरेशी यांनी दिली.

१० ऑगस्टला जीममध्ये ट्रेड मिलवर धावत असताना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर राजू श्रीवास्तव बेशुद्ध झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांची एन्जिओग्राफी करण्यात आली मात्र एन्जिओग्राफी नंतरही ते बेशुद्धच असल्याची माहिती समोर आली होती. मिळालेल्या माहितीनुसार एन्जिओग्राफिमध्ये एका ठिकाणी १०० टक्के ब्लॉक सापडल्याचे सांगण्यात आले होते. तेव्हा पासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. गेल्या आठ दिवसांपासून ते बेशुद्ध होते. आज त्यांची प्रकृती आधीपेक्षा खराब असून मेंदू जवळपास ‘डेड’ अवस्थेत पोहोचला होता आणि हार्टमध्येही समस्या होत्या.