केंद्रीय मंत्रीपदासाठी श्रीरंग बारणे यांचे नाव आघाडीवर

0
273

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. अनेक इच्छुक आमदारही मंत्रिमंडळ विस्ताराची आतुरतेने वाट वाट पाहत आहेत. मात्र राज्य मंत्रिमंडळ विस्ताराआधीच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला तीन मंत्रीपदं मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. शरद पवार यांचे पुतणे पार्थ पवार यांचा मावळ लोकसभा मतदारसंघातून पराभव करणारे श्रीरंग बारणे यांचे नाव अग्रभागी असल्याचे समजते.

शिंदे गटाला एक कॅबिनेट मंत्रिपद आणि दोन राज्यमंत्रिपदं मिळणार असल्याची माहिती आहे. मुंबई, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना संधी मिळू शकते. राहुल शेवाळे, प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.

बीएमसी निवडणुका जवळ आल्याने राहुल शेवाळेंना मंत्रीपद दिलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला शह देण्यासाठी म्हणून शेवाळे यांची नियुक्ती आहे, तर अजित पवारांना रोखण्यासाठी त्यांच्या पिंपरी चिंचवड शहराबरोबरच पश्चिम महाराष्ट्र मजबूत करण्यासाठी श्रीरंग बारणेंना मंत्रीपद देण्यात येणार आहे.

विदर्भातही प्रतापराव जाधव यांना मंत्रीपद दिलं जाणार आहे. प्रतापराव जाधव हे लोकसभेत सलग तिसऱ्यांदा निवडणूक गेले आहेत. त्यांची ही तिसरी टर्म आहे. यापूर्वी सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. मनोहर जोशींच्या काळात ते क्रीडा मंत्री होते.

नितीश कुमार, उद्धव ठाकरे आणि अकाली दलाचे सुखबीर सिंग बादल यांनी एनडीएची साथ सोडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या रूपानं भाजपला खंबीर साथीदार मिळाला आहे. त्यामुळे भाजपनं शिंदे गटाला तीन मंत्रीपदं देण्याचं ठरवलं असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जातंय.