“कामाशी बांधिलकी असलेले कार्यकर्ते निर्माण झाल्यास विकास!”

0
400

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – “कामाशी बांधिलकी असलेले कार्यकर्ते निर्माण झाल्यास विकास निश्चित होतो!” असे विचार ज्ञानेश्वर लांडगे यांनी पैस रंगमंच, मुंबई-पुणे हमरस्ता, चिंचवड येथे रविवार, दिनांक ०९ ऑक्टोबर २०२२ रोजी व्यक्त केले. कलारंजन प्रतिष्ठान, नवी सांगवी या संस्थेच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चाळिशीचे औचित्य साधून पहिले महापौर ज्ञानेश्वर लांडगे यांचा शहराच्या २६व्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ प्रदान करून विशेष गौरव करण्यात आला. कलारंजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले, कार्यवाह शिरीष पडवळ यांच्यासह स्थायी समिती माजी अध्यक्ष नितीन लांडगे, पवना बँकेचे उपाध्यक्ष जयनाथ काटे, शरद काळभोर, महेश बोराडे, प्रा. बी. आर. माडगूळकर, ज्येष्ठ साहित्यिक बशीर मुजावर, ह.भ.प. अशोकमहाराज गोरे, रंगकर्मी अमृता ओंबळे आणि पिंपरी-चिंचवडमधील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रांतील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.

प्रतिष्ठानचे कार्यवाह शिरीष पडवळ यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत चौगुले यांनी प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून ज्ञानेश्वर लांडगे यांच्या सुमारे पंचावन्न वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीचा पट उलगडला. पारंपरिक शेती, दूधदुभते यांची समृद्धी, तालमीतील कुस्तीचे आखाडे या परिस्थितीत व्यतीत झालेले बालपण, १९६३ साली पुणे विद्यापीठाकडून कुस्तीचे कर्णधार म्हणून मिळालेली, १९६७ साली भूषविलेले भोसरीचे सरपंचपद, १९८६ साली पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पहिले महापौर होण्याचा बहुमान, १९९० साली निवडणुकीतून वाट्याला आलेली आमदारकी, पवना बँकेच्या आणि पिंपरी-चिंचवड तंत्रनिकेतन शिक्षण संस्थेच्या उभारणीत दिलेले भरीव योगदान श्रोत्यांसमोर किस्से, हकिकतींच्या रूपांतून साकार करण्यात आले.

भोसरी गावातील पाण्याचा प्रश्न सोडविण्याकरिता सार्वजनिक विहिरी खोदण्यासाठी पन्नास वर्षांपूर्वी उभारलेली नाट्य चळवळ तसेच निवडणुकीतील अटीतटीचे डावपेच सांगताना ज्ञानेश्वर लांडगे यांनी सामाजिक कार्याचा प्रारंभ करताना पिंपरी-चिंचवडचे भाग्यविधाते असलेल्या अण्णासाहेब मगर यांचे मार्गदर्शन आणि सान्निध्य लाभले, हे माझे भाग्य आहे असे कृतज्ञतापूर्वक नमूद केले. अण्णासाहेब मगर यांच्या कामाचा आवाका खूप प्रचंड होता. कोणत्याही कार्यकर्त्याला शब्द दिला की ते तो शब्द पाळण्यासाठी खूप कष्ट घेत असत. या गोष्टींचा माझ्या सामाजिक जीवनावर खूप सखोल परिणाम झाला, असेही लांडगे यांनी सांगितले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मधू जोशी यांनी ज्ञानेश्वर लांडगे यांच्या राजकीय आणि पंडित गवळी यांनी सामाजिक कार्यपद्धतीच्या आठवणी कथन केल्या. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रभाकर पवार यांनी आभार मानले.