कर संकलन विभागाच्या सिध्दी 2.0 प्रकल्पाला सुरुवात

0
164
  • मालमत्ता कर बिले वाटपाचा ‘श्रीगणेशा’
  • ओटीपीद्वारे मोबाईल क्रमांक व्हेरिफाय करण्याचे महापालिकेचे आवाहन

पिंपरी – गतवर्षी महिला बचत गटाच्या वतीने मालमत्ता कराची बिले वाटपाचा निर्णय यशस्वी झाल्यानंतर 2024-25 या आर्थिक वर्षातही महिला बचत गटाच्या मार्फत बिलांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी ओटीपीद्वारे आपल्या मालमत्तेचा जोडलेला मोबाईल क्रमांक व्हेरिफाय करावा, असे आवाहनही महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.

         पिंपरी-चिंचवड शहरात 6 लाख 25 हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. त्यानुसार सव्वा सहा लाख बिलांची छपाई होऊन बिले वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. या वर्षी प्रथमच बिलावर युपिक आयडी छापण्यात आला आहे. पालिकेमार्फत चालू असलेल्या सर्वेक्षणात ज्या मालमत्तांचे सलग क्रमांक (geo -sequencing) देऊन झाले आहेत त्या मालमत्तांच्या बीलावर युपिक आयडी दिलेला आहे. हा लक्षात ठेवण्यासाठी सोपा असून पुढील वर्षापासून सर्व मालमत्तांना युपिक आयडी दिलेला असेल. महापालिकेच्या सर्व सेवा सुलभ मिळण्यासाठी याचा नागरिकांना भविष्यात फायदा होणार आहे. 

महापालिकेच्या सर्व सेवा ऑनलाईन

महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने गतवर्षीच सर्व सेवा आणि सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. एकही अर्ज ऑफलाईन स्विकारला जात नाही. मालमत्ता धारकांसाठी मोबाईल क्रमांक मालमत्तेला लिंक असणे अत्यंत आवश्यक झाले आहे. मालमत्ता धारकांना स्वतःचा मोबाईल क्रमांक व्हेरिफाय करण्यासाठी महिलांना देण्यात आलेल्या सिध्दी ॲपमध्ये मोबाईल क्रमांक ओटीपीव्दारे व्हेरिफाय करण्याची सुविधा देण्यात आली आहे. महिला जेव्हा नागरिकांना बिल द्यायला येतील तेव्हा नागरिकांना मोबाईल क्रमांक व्हेरिफाय करण्यासाठी ओटीपी मागतील. तेव्हा ओटीपी देऊन सहकार्य करावे. मोबाईल क्रमांकाशिवाय सेवांचा ॲक्सेस करता येत नाहीत. त्यामुळे ज्यांनी यापूर्वी मोबाईल क्रमांक दिला नाही, त्यांनी मोबाईल क्रमांक द्यावा. तसेच महापालिका मालमत्ता धारकांचा डेटा प्रायव्हसी जपण्याच्या दृष्टीने हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे आहे.

5 हजार थकबाकीदारांना जप्ती पूर्व नोटीसा
31 मार्च 2023 अखेर शहरातील 75 हजार 858 मालमत्ता धारकांकडे दहा हजार पेक्षा जास्त रक्कम थकीत आहे. या मालमत्ता धारकांकडे तब्बल 717 कोटी 32 लाख रुपयांची थकबाकी आहे. या मालमत्ता धारकांना बिलाबरोबरच जप्ती पूर्व नोटीसा देण्यात येत आहेत.

र्वाधिक थकबाकीदार चिखली झोनमध्ये
कर संकलन व कर आकारणी विभागाचे शहरात 17 झोन आहेत. यामध्ये सर्वाधिक थकबाकीदार हे चिखली झोनमध्ये 10 हजार 209, थेरगाव मध्ये 7 हजार 772, वाकड मध्ये 6 हजार 915 तर सर्वात कमी तळवडे झोनमध्ये 1 हजार 694 थकबाकीदार आहेत.

मतदान जागृतीत कर संकलन विभागाचाही हातभार
पिंपरी-चिंचवड शहर हे मावळ, शिरूर आणि बारामती या तीन लोकसभा मतदारसंघात विभागले आहे. यामध्ये दि. 7 मे रोजी बारामती तर मावळ आणि शिरूरमध्ये दि. 13 मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाचा टक्का वाढण्याच्या दृष्टीने कर संकलन विभागाच्या वतीने मालमत्ता करांची बिले वाटत असतानाच जिल्हा निवडणूक कार्यालयाने दिलेले मतदान जनजागृतीचे पॅम्प्लेटही घरोघर देण्यात येत आहे.