वाकड, दि. ३ (पीसीबी) – फायनान्स कंपनीकडून कर्ज काढून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. या तिघांनी तब्बल 185 जणांना फसविल्याचे उघडकीस आले आहे.
बालाजी उर्फ एकनाथ बळीराम घोडके (वय 32, रा. यवत, ता. दौंड, पुणे), संग्रामसिंह अरुणराव यादव (वय 46, रा. ताराबाई पार्क, कोल्हापूर), राजवीर उर्फ हसन अकबर मुजावर (वय 30, रा. कसबा बावडा, कोल्हापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपूर्वी वाकड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील फिर्यादीला हॉटेलचे नूतनीकरण करायचे असल्याने पैशांची आवश्यकता होती. त्यांना पाच कोटी रुपयांचे कर्ज काढून देतो असे आरोपींनी आमिष दाखवले. प्रोसेसिंग फी आणि ऍडव्हान्स हप्ता म्हणून दोन लाख 45 हजार रुपये घेऊन फसवणूक केली.
गुन्हा दाखल झाल्यानंतर वाकड पोलिसांसह गुन्हे शाखा युनिट चारने समांतर तपास करत बालाजी घोडके याला यवत येथून ताब्यात घेतले. त्याच्या दोन साथीदारांना कोल्हापूर येथून ताब्यात घेतले. आरोपींकडे वेगवेगळ्या बँकांचे 185 कोरे, रक्कम लिहिलेले चेक, कागदपत्रे आणि मोबाईल फोन आढळून आले. या तिघांनी मिळून 185 जणांची कर्ज देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
फसवणूक झाली असेल तर पोलिसांशी संपर्क करा
कर्ज काढून देतो असे सांगत प्रोसेसिंग फी आणि ऍडव्हान्स हप्त्यापोटी पैसे घेऊन फसवणूक करण्याची मोडस हे आरोपी वापरत होते. अशा प्रकारे फसवणूक झाली असेल तर नागरिकांनी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चार येथे संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.