करवाढ नसलेला पिंपरी चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर

0
312

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 2023-24 या आर्थिक वर्षाचे 5 हजार 298 कोटी रुपयांचा मूळ; आणि केंद्र सरकार पुरस्कृत योजनांसह एकूण 7 हजार 127 कोटी 88 लाख रुपयांचा अर्थसंकल्प मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे यांनी पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना आज मंगळवारी सादर केला. आयुक्तांनी तो तत्काळ मंजूरही केला. गेली वर्षभर महापालिकेवर प्रशासक राज असल्याने अर्थसंकल्पात नागरिकांच्या सुचनांचा समावेश अर्थसंकल्पात कुठेही केल्याचे दिसत नाही.

पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रशासकिय काळात अर्थसंकल्प सादर करण्यात. पालिका बरखास्त असल्याने अभ्यासाची मागणी करणारे कोणी नव्हते. प्रशासकीय राजवटीत अर्थसंकल्प सादर होण्याचीही ही पहिलीच वेळ होती. हा देखील योगायोग म्हणावा की आज राज्यव्यापी कर्मचाऱ्यांचा संप असून त्यात पिंपरी चिंचवड महापालिकेचे कर्मचारीही सकाळपासून मुख्य गेटवर धरणे आंदोलनाला बसले आहेत. संपाच्या छायेत आयुक्त शेखर सिंह यांना पालिकेचा अर्थसंकल्प सादर करावा लागला. अर्थसंकल्पाच्या दिवशी संपामुळे अतिरिक्त आयुक्त आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या खासगी वाहनांतून पालिका इमारतीत पोहोचण्याचीही ही पहिलीच वेळ आहे.

मालमत्ताकर, पाणीकरात वाढ नाही –
आगामी वर्ष हे निवडणुकीचे वर्ष असल्याने या अर्थसंकल्पातून पिंपरी-चिंचवडकरांवर करवाढीचा बोजा टळला आहे. अपवाद वगळता, कोणत्याही नवीन घोषणा करण्यात आलेल्या नाहीत. पालिकेचे उत्पन्न कसे वाढेल, याबाबत अर्थसंकल्पात कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही.

जुन्या योजनांना बळ
पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा आणि वाहतूक या बाबींना प्राधान्य देऊन निधीची तरतूद करण्यात आली आहे. सध्याचा पाणीपुरवठा, सांडपाणी प्रकल्प आणि उड्डाणपूल पूर्ण करणे, शिक्षण व्यवस्था सुधारणे यावर बजेटमध्ये भर असल्याने महापालिका आयुक्तांनी कोणतेही नवीन प्रकल्प सुचवलेले नाहीत. 6 कोटी 30 लाख रुपये शिलकी असलेल्या या अर्थसंकल्पात जुन्या योजनांच्या सक्षमीकरणावर भर देण्यात आला असून पालिकेला केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान दिले जाते आणि बँकेच्या ठेवींचाही आधार घेतला जातो. या पार्श्‍वभूमीवर उत्पन्नाचे नवीन स्त्रोत नसल्याची भूमिका महापालिका आयुक्तांनी मांडली आहे.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, ‘एकात्मिक विकासाच्या संकल्पनेनुसार पालिकेच्या कार्यक्षेत्रात रस्ते पूल, रुग्णालये, क्रीडांगणे, शाळा आदी सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधांची उभारणी करून सुलभ दळणवळण, आधुनिकतेने शहराचे सुशोभीकरण केले जाणार आहे. वैद्यकीय सेवा आणि शैक्षणिक गुणवत्ता आणि विविध खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन. या सुविधा शहरातील सर्व विभागांना परवडणाऱ्या आणि सहज उपलब्ध करून देण्याचा माझा मानस आहे. पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच शहराला पर्यावरणपूरक बनवणे आणि शहरातील नागरिकांचे आरोग्य आणि जीवनमान सुधारणे. नागरिकांची सुरक्षितता राखणे, विविध उद्याने अद्ययावत करून मनोरंजन आणि मनोरंजनासाठी सुविधा निर्माण करणे आणि शहरातील सर्व सामाजिक घटकांना आवश्यक सेवा त्वरित उपलब्ध करून देण्याचा माझा मानस आहे.

अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये –

1) विविध विकास कामांसाठी 1801 कोटी 35 लाख
2) शहरी गरिबांसाठी 1524 कोटी
3) महिला योजनेसाठी 48 कोटी 24 लाख
4) क्षेत्र स्तरावरील विकास कामांसाठी 150 कोटी
5) पाणी पुरवठा विशेष निधी 154 कोटी
6) अमृत योजनेसाठी 20 कोटींची तरतूद
7) बांधकाम विशेष योजना 846 कोटी
8) स्मार्ट सिटीसाठी 50 कोटींची तरतूद
9) अपंग कल्याण योजनेसाठी 45 कोटी 6 लाख
10) पीएमपीएमएलसाठी 294 कोटींची तरतूद
11) अतिक्रमण हटाव यंत्रणेसाठी 10 कोटी 50 लाख
12) भूसंपादनासाठी 120 कोटी