ओझर्डे गावात शिरगाव पोलिसांचा दारूभट्टीवर छापा

0
93

मावळ तालुक्यातील ओझर्डे गावात सुरु असलेल्या दारूभट्टीवर शिरगाव पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. त्यात पोलिसांनी दोन लाख 13 हजारांचा मुद्देमाल नष्ट केला. ही कारवाई रविवारी (दि. 5) दुपारी बारा वाजताच्या सुमारास पवना नदीच्या काठावर करण्यात आली.

शरणशक्ती सुरंग राठोड (वय 35, रा. ओझर्डे, मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार रामेश्वर जाधवर यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राठोड याने ओझर्डे गावात पवना नदीच्या काठावर झुडुपाच्या आडोशाला दारूभट्टी लावली. त्याने दारू तयार करण्यासाठी गुळ मिश्रित रसायन साठवून ठेवले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर शिरगाव पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यात दोन लाख 13 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.