ऐशी की तैशी…“अपघात घटना नसते तो रोग आहे”

0
145

अपघात ही दुर्दैवी घटना नसून सर्वाधिक मनुष्यहानी होणारा महाभयंकर रोग आहे . जगात दररोज असंख्य लोक यामुळे मृत्युमुखी पडतात . एखाद्या निष्पाप जीवाचा बळी जातो नि याचा धक्का मनाला लागतो . समाज तात्कालिक हळहळ व्यक्त करतात . त्याला भावनिक झालर असली की मोर्चा , आंदोलने , भडकलेल्या भावनांचा उद्रेक होतो .त्यावेळी स्थानिक प्रशासन ही जागे होते . काही क्रिया प्रतिक्रिया उमटतात नि मग पान उलटले जाते नि मागचा अध्याय इतिहास होतो..

आम्ही लोकमान्य हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो अपघातग्रस्ताना जवळून पाहिले आहे . प्रत्येकाची वेगळी स्टोरी असते . कुणाचा तरी निष्पाप जीवाचा हकनाक बळी जातो . त्यात बळी जाणारे तरुण असले की त्याच्या माता पित्यांना म्हातारपणी पुत्रशोक होतो ..बायकपोर अनाथ होतात ..तीन पिढ्या उद्ध्वस्त होतात .आमचे लोकमान्यचे देशातील कम्प्रेहैन्सिव ट्रामा मैनेजमेंट कन्सेप्टचे जनक डॉ. नरेंद्र वैद्य नेहमी म्हणतात Trauma is great equiliser ….तो कुणालाच सोडत नाही …त्यामुळे अपघात या विषयाकडे गांभीर्याने पाहायला हवे . अपघाताने भक्ती बर्वे इनामदारसारखी कलाकार , अक्षय पेंडसे सारखा अभिनेता , विनायक मेटे , गोपीनाथ मुंढे सारखे लोकनेते , डॉ. केतन खुर्जेकर यासारखे तरुण डॉक्टर यासारख्या प्रतिथयश लोकांचा बळी घेतला .तुमच्या माझ्या सारखे सामान्य लोकाना तर कोण मोजतो ?

साधारणत: याची कारणे पहिले तर अशीच असतात .कुणी पियून चालवतोय , कुणी बापाचा रोड असल्यासारखे प्रचंड वेगात स्टंट करत चाललाय यासारखीच …बहुसंख्य कारणे ही मानवाच्या चुकीमुळेच …पण पाहतोय कोण ?

पुण्यात एका श्रीमंतीच्या माजाने माजलेल्या मुलाने केलेल्या कृत्याला प्रशासनाने तत्परतेने केलेल्या पराक्रमाने समाजाला खडबडून जाग आली नि घटनेने रणकंदन माजले .

नेहमी आपल्या मग्रुरीसाठी प्रसिद्ध असलेल्या वर्दीला त्या कोवळ्या मुलांचा आलेला गहीवर पाहून पुणेकरांचे मन कृतकृत्य झाले ..त्यानी तत्परतेने श्रीमंताच्या पुढे घातलेले लोटांगण नि त्याहीपेक्षा रामशास्त्रीच्या बाण्याने त्या कोवळ्या जीवाच्या मनावर दीर्घकाळ ओरखडा निर्माण होईल अशी त्याला दिलेली ३०० शब्दांची निबंध लेखनाची शिक्षा , १५ दिवस वाहतुकीचे पोलिसाबरोबर राहून करावयाची वाहतूक नियमन पाहून आपण किती सज्जनाच्या सहृदयी लोकांच्या देशात राहतो याची मनास जाणीव झाली. त्यामुळे संवेदनशील पुणेकरानी त्यांच्या पद्धतीने वेगवेगळया माध्यमातून बोंबा मारुन सर्वांना जागे केले. एकदा पुणेकर जागा झाला की देश हादरल्याशिवाय रहात नाही हा इतिहास आहे. पुणेकर सतत जागता रहाणे देशासाठी त्यामुळेच गरजेजचे आहे ..पण या गोष्टीकडे परत आपण घटना म्हणून पाहणार नि विसरणार की यातूनकाही बोध घ्यायला हवा…

प्रत्येक जीव हा बहुमूल्य आहे तो कुणाचा की असो. एकवेळ जेवणाची पंगत चुकली तर चालते पण बरोबरच्या मित्रांची संगत चुकून चालत नाही ..चुकीच्या संगतीने आयुष्याला क्षणिक रंगत येते पण ती रंगत विनाशाला कारणीभूत ठरते . अपघात टाळवायचे असतील तर पोलिस , शिक्षा दंड हे तर आवश्यकच आहे पण त्याही पक्ष त्यांच्या संवेदनशील मनाला अपघाताच्या मुळे होणाऱ्या गंभीर परिणामांची जाणीव सतत करुन देणे आवश्यक आहे ..
याच पुण्यातील पंडितांनी डोक्यावर पातिले घालून आम्ही हेल्मेट घालणार नाही याचे आंदोलन केलेले होते हे विसरून कसे चालेल. महाराष्ट्राचे माजी उपमुखमंत्री कै .आर आर पाटील यांनी पनवेलचे बार बंद करुन क्रांती केली होती .त्यामुळे कोवळ्या वयात लागलेली कीड कमी करण्यात यश आले होते नि मध्यरात्री एक्सप्रेस वे वर तरफडणारे अनेक प्राण वाचले. महाराष्ट्राला अश्या नेतृत्वाची गरज आहे.

आज दुर्दैवाने तरुणांचे आदर्श नि सुखाच्या भंपक कल्पना बदलल्या आहेत. त्याना हातात बियर , साथीला डियर ,नी दुंगणाखाली प्रीमिअर कार करुन चियर्स करुन जगायचे आहे नि आई वडिलांनाही तो सलमान खानसारखा हिरो हवा आहे. गुडग्यावर फाटलेली पँट असली की तो पुढारीत विचाराचा वाटतो . आज काल चड्डीत रहायला कुणाला आवडते सांगा ना?

महात्मा गांधी उंची बंगल्यात राहिले नाहीत तर अजन्म झोपडीत राहिले , पोशोसारख्या कारमध्ये फिरले नाहीत तर पायी चालले , मूल्यांची श्रीमंती जपली नि आयुष्याशाची उंची वाढविली .आंबेडकर खेड्यात जन्मले .लाईटच्या दिव्याखाली अभ्यास केला नि अंधारात लोपलेल्या दिन दलितांच्या ,पीडितांच्या आयुष्याला प्रकाश दिला. ज्ञानदेवांनी आपल्या वडिलांच्या संन्याशी वृत्तीमुळे ज्यांनी वाळीत टाकले त्या समाजाला ,जगाला दोषी न ठरवता जगाच्या कल्याणाची प्रार्थना केली नि पसायदान सारखे जगतकाव्य लिहले . हे समाजमनांचे आदर्श व्हायला हवे. आज आजबाजुला पहिले तर घरांची उंची वाढली आहे पण माणस खुजी झाली आहेत , माणसांना कोणत्या का मार्गाने मिळेना गाडी बंगला हवा आहे पण चांगला माणूस म्हणून जगण्याची जिद्द नाही ..गरिबीतून आलेले आय ए एस ऑफिसरसुद्धा लावलीपावलीसाठी भ्रष्ट होतात , इमान विकतात, गरिबीने होरपळलेल्या पूर्व आयुष्याची जाणीव ते विसरतात नि पैश्यापुढे शिक्षण , ज्ञान गहाण ठेऊन लाचार होतात मग समाजाने आदर्शासाठी ,न्यायासाठी पहायचे कुणाकडे ?आदर्श ठेवायचा कुणाचा …

मी राजकारणाविषयी लिहितच नाही कारण त्यानी आता नेता या शब्दाची लाज ठेवलीच नाही..जी राष्ट्रे संस्कृती मूल्याच्या पायावर उभी असतात तीच इतिहास घडवतात ..हिलरी क्लिटन म्हणाल्या होत्या , आनंदने जगून श्रीमंत व्हायचे असेल तर भारतीय संस्कृती जोपासली पाहिजे , उंची घरे , बंगला गाड्याची श्रीमंती हवी असेल तर अमेरिकेकडे पाहायला हवे…

म्हणून हे परिवर्तन मानसिक पातळीवर व्हायला हवे , तसे परिवर्तन झाले नाही तर वेगळे काय घडणार?
आपल्या पाल्याला चित्रपटातील नायकासारखे करायचे की मुलांचे चारित्र्य घडवून नायक करायचे याची जबाबदारी पालकाची आहे.. अग्रवालच्या घटनेनं पुणेकर जागा झाला हे बरे झाले पण हाच धागा जिवंत ठेऊन मुलांच्या संस्कारक्षम मनाला योग्य वळण दिले तर अनेक

निष्पाप वाचतील नि पुणे तेथे काय उणे हे सार्थ होईल, नाही का?
डॉ.श्रीकृष्ण जोशी,
पुणे