सोलापूर, दि. २२ (पीसीबी) : तीन वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार की काय, अशी स्थिती राज्यात निर्माण झाली आहे. भाजपच्या माध्यमातूनच तसा प्रयत्न होत असतानाही पक्षाचे नेते त्यासंदर्भात काहीच माहिती नसल्याचे भासवत आहेत की का, अशी स्थिती पहायला मिळत आहे. पण, सध्याची राजकीय उलथापालथ ही राजकीय हेतूने प्रेरित नसून ’ईडी’च्या धास्तीनेच होत असल्याचा आरोप शिवसेनेतील काही नेते करीत आहेत. राष्ट्रवादी आणि शिवेसेनेचे डझनभर नेते ईडी च्या रडारवर आहेत.
अनिल देशमुख आणि नवाब मलिक कित्तेक दिवस जेलमध्ये पडून आहेत. उध्दव ठाकरे यांच्या कुटुंबासह संजय राऊत, अनिल परब, भावना गवळी, आनंद आडसूळ, प्रताप सरनाईक हे ईडी मुळे चिंताग्रस्त आहेत. तिकडे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची सलग पाच दिवस ईडी कसून चौकशी करत असल्याने महाविकास आघाडीचे अनेक नेते धास्तावलेले आहेत. एकनाथ शिंदे यांचे बंडसुध्दा केवळ ईडी च्या टेन्शनमुळेच असल्याचे अनेकजण सांगत आहेत.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन तीन वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच सरकार पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पण, तीन वर्षे एकमेकांच्या मांडीला मांडी लावून काम करणाऱ्या शिवसेना नेत्यांना (नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, माजी मंत्री तानाजी सावंत व त्यांच्यासोबतचे आमदार) यांना आताच स्व. बाळासाहेबांच्या हिंदुत्त्वाची आठवण का झाली, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, ‘ईडी’च्या चौकशीनंतर महाविकास आघाडीतील दोन मंत्री (अनिल देशमुख, नवाब मलिक) जेलमध्ये गेले आहेत. आता परिवहन मंत्री ॲड.
अनिल परबदेखील सध्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. सर्वात मोठी बाब म्हणजे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही ‘ईडी’ची नोटीस गेली असून राहुल गांधी यांची सलग तीन दिवस ३० तास चौकशी झाली. याची धास्ती शिवसेनेतील काही नेत्यांनी, आमदारांनी घेतल्याचे बोलले जात आहे. त्यातूनच ही राजकीय उलथापालथ होऊ लागल्याचे तर्कवितर्क लढविले जात आहेत.