एआय तंत्रज्ञानामुळे ७० ते ८० टक्के नोकऱ्या जाणार –

0
130
  • -चॅट जीपीटी, नॅनो टेक्नॉलॉजी, जेनेटिक इंजिनीअरिंग, स्पेस मायनिंग आजची जगण्याची पध्दत कालबाह्य

‘तंत्रज्ञानामुळे मागच्या पंधरा वर्षांत मनुष्याने आजवरचा सर्वोच्च विकास साधला आहे. मात्र, कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या (एआय) तंत्रज्ञानामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या जवळपास ७० ते ८० टक्के नोकऱ्या संपतील,’ अशी भीती लेखक अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केली. ‘रोबोटिक्समुळे माणसाच्या बहुतांश गरजा कृत्रिमरित्या भागवल्या जातील. मानवी जीवनाच्या वेगामुळे एकीकडे विकासाचे टोक गाठताना दुसरीकडे बेरोजगारीचा प्रश्नही निर्माण होईल,’ असा धोका त्यांनी वर्तविला.

कृष्णा पब्लिकेशन आणि आशय लिटररी एजन्सीतर्फे गोडबोले आणि आसावरी निफाडकर यांच्या ‘फ्युचरटेक’ आणि गोडबोले व अमृता देशपांडे यांच्या ‘भन्नाट शोध’ या पुस्तकांच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ, ‘आशय’चे चेतन कोळी उपस्थित होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी अध्यक्षस्थानी होते.

जोशी म्हणाले, ‘शिक्षणव्यवस्थेत आज ठरावीक पठडीतून शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांच्या फौजा बाहेर पडत आहेत; पण त्यांच्यातले कुतूहल जागवण्याचे कार्य शिक्षकांकडून होताना दिसत नाही. तंत्रज्ञानाच्या रेट्यात मानवी भावनांचे महत्त्व कमी होईल की काय, अशी भीती आहे; पण तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी मानवी संवेदनेला पर्याय नाही.’

ग्रंथविक्रीतील उल्लेखनीय कार्याबद्दल पुस्तक पेठचे (नाशिक) निखिल दाते; तसेच गोडबोले यांच्या साहित्यावर पीएचडी केलेल्या डॉ. तनुजा मुळे आणि ‘फ्युचरटेक’ पुस्तकाचे सहायक अभिजित वावरे यांचा सत्कार करण्यात आला. यशश्री पुणेकर यांनी सूत्रसंचालन केले.

माणसाला पडणारे प्रश्न आणि शोधलेली उत्तरे ही माणसाच्या उत्क्रांतीतला महत्त्वाचा घटक आहेत. कल्पनाशक्तीच्या बळावर माणसाने स्वतःच्या सुखासाठी अनेक सोयीसुविधा निर्माण केल्या. आता माणूस स्वत:च्याच मेंदूवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, चॅट जीपीटी, नॅनो टेक्नॉलॉजी, जेनेटिक इंजिनीअरिंग, स्पेस मायनिंग अशा अनेकानेक तंत्रज्ञानांमुळे सध्याची जगण्याची पद्धत आणि व्यवस्था या नव्या जगात कालबाह्य ठरतील, असे गोडबोले म्हणाले