१५ डिसेंबर २०१३ रोजी औरंगाबाद येथे स्वर झंकार आयोजीत ‘लिजण्डस् लाईव्ह इन कन्सर्ट’ या कार्यक्रमात पं. शिवकुमार शर्मा व उ. झाकीरभाई हुसेन यांचे वादन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या नियोजनातील एक या नात्याने या दोन्ही कलाकारांचा अगदी जवळून परिचय झाला. पं. शिवकुमार शर्मा यांच्याबरोबर या आधी झालेल्या कार्यक्रमामुळे संबंध आलाच होता, परंतु झाकीर नावाचे वलय असलेला कलाकार प्रत्यक्षात कसा आहे याची उत्कंठा व उत्सुकता लागली होती. त्यांची पहीली मैफील सवाई गंधर्व महोत्सवात १९८३ साली अनुभवली होती आणि तेव्हापासून या कलाकाराची भेट व्हावी, ओळख व्हावी अशी एक सुप्त इच्छा होती, अगदी देव कधीतरी भेटावा अशी. माझे मित्र व आयोजक असलेले श्री. प्रसाद कोकीळ, व्हायोलीन अकादमीचे पं. अतुलकुमार उपाध्ये व मी सकाळी विमानतळावर गेलो. विमानतळावर झाकीरभाईंचे जेव्हा आगमन झाले, ते अगदी साध्या जीन पॅण्ट्स व शर्टमध्ये. त्यांना पाहून मी त्यांच्या पाया पडायला लागलो तर त्यांनी मला अर्ध्यातच थांबवले, माझे दोन्ही हात त्यांच्या हातात घेतले व म्हणाले,
“आपण कसे आहात? खूप वेळ वाट पहावी लागली का?”
मी हे ऐकून मी चक्क उडालोच आणि उस्तादजीऐवजी मी चुकून पंडीतजी म्हणून त्यांना संबोधले व म्हणालो,
“पंडीतजी सफर कैसा रहा?”
“यहाँ पंडीतजी कौन है?”
मी कानाला हात लावला व म्हणालो,
“माफ करा, उस्तादजी, उस्तादजी”
“यहाँ उस्तादजी कौन है? मै सिर्फ झाकीर हूं, झाकीर बोलीये”
“भाईसाब आप बडे है, मै आपका नाम ऐसा नही ले सकता”
“आपने भाईसाब कहा है, ये सबसे अच्छा है, सब झाकीरभाई बोलते है, लेकीन आपने जो भाईसाब करके पुकारा तो अच्छा लगा”
अर्ध्या मिनिटामध्ये या माणसाने मला एकदम घरचा माणूस भेटावा तस आपलसं केल होत. आता विमानतळावरील गर्दीला समजले होते की हे झाकीरभाई आहेत व त्यांच्यामधे कुजबुज सुरू झाली होती. आम्ही गाडी तयार ठेवली होतीच, त्यांना लगेच आम्ही गाडीत बसवले, सामान ठेवले व निघालो. गाडीत मग अगदी अनौपचारीक गप्पा सुरू झाल्या. त्यात असा एक विषय निघाला की तबला वादकांमधे एक ते दहा क्रमांकावर झाकीरभाई आहेत व बाकीचे कलाकार अकरा क्रमांकानंतर सुरू होतात, त्यावर झाकीरभाई म्हणाले की,
“I beg to differ from you”
“आज भारतमे २० तबला कलाकार ऐसे है की जो एकही कॅटेगरी के है. आनंदो चॅटर्जी, शुभांकर बॅनर्जी, कुमार बोस, योगेश, सपनदा.. और उनमेसे मै भी एक हूं . There is a proverb in English, “Every dog has his days”, and right now I am the dog who is enjoying his days. But we all are in the same category. मै बुरा नही बजाता”
शेवटच वाक्याने आम्ही जरी सर्व एकदम हसलो तरी आधीच्या वाक्यांनी आम्हा सर्वांवर एकदम मोहीनी टाकली होती. मी त्यांना म्हणालो,
“भाईसाब ये तो आपका बडप्पन है, लेकीन आपको तो ये मानना ही पडेगा की आपने तबला पॉप्युलर कर दिया”
“Again, I beg to differ from you. आज लोग कहते है की तबला हमने पॉप्युलर किया, लेकीन इसके पहले हमारे बुजुर्गोंने इतना काम करके रखा था की हम उनके रास्तेसे सिर्फ चल रहे है और तबला अपने आप पॉप्युलर होते जा रहा है. अब्बाजी (उ. अल्लारखाँ), सामताप्रसादजी, अमीर हुसेन खाँ, थिरकवाँ साहेब, किशन महाराजजी.. ये लोगोने क्या काम करके रखा है.. हम उन्होने सिखाया हुवाही बजाते है.. उन्होने फौंडेशन करके रखा है..और लोग हमे क्रेडीट दे रहे है”
आपल्या आधीच्या पिढीबरोबर असलेला नितांत आदर व आपल्या बरोबरीच्या पिढीच्या कलाकारांचाही तितकाच सन्मान ठेवणाऱ्या या कलाकाराचे हे शब्द ऐकून आम्ही भारावून गेलो. त्यांच्याविषयी जनसामान्याचे असलेले मत त्यांना माहीत असेलच, पण झाकीरभाई स्वत:ला तबल्याच्या नकाशावर कुठे पहातात हे पाहून, आम्ही एखाद्यासमोर नतमस्तक होणे म्हणजे काय याचाच अनुभव घेत होतो. इतरही गप्पा चालल्या होत्या व अशा मंत्रावलेल्या गप्पात ताज हॉटेल कधी आले समजलेच नाही. भाईसाबना भूक लागली होती व ते म्हणाले मी आधी ब्रेकफास्ट करतो व नंतर रूममधे जातो. तुम्ही सर्वजण माझ्याबरोबरच ब्रेकफास्ट करा. खरेतर ब्रेकफास्टपेक्षा त्यांचा सहवास अजून हवा होता त्यामुळे आम्ही सर्वांनी पडत्या फळाची आज्ञा लगेच मानली..
ब्रेकफास्ट करतांनादेखील त्यांची चौफेर फटकेबाजी चालू होती. पु. ल. देशपांडे जसा शब्दच्छल करून कोटी करत तशा भाईंसाबांच्या कोट्या चालल्या होत्या. आमचेही विनोद, अनुभव यांची देवाणघेवाण चालली होती. त्यांना ग्रीनरूम मध्ये व स्टेजवर काय लागेल याची माहीती घेतली. त्यांना मसाला चहा खूप आवडतो. ग्रीनरूममे मसाला चाय मिलेगी तो मजा आयेगा असे त्यांनी सांगितल्यावर अर्थातच आम्ही अगदी थर्मास भरून मसाला चहा ग्रीनरूममध्ये ठेवला होता. ब्रेकफास्टच्या दरम्यान त्यांनी पं. शिवकुमारजींची चौकशी केली. पंडीतजी आदल्या दिवशीच आले होते. पत्रकार मित्रांनी त्यांची मुलाखतीसाठी परवानगी मागीतली होती. त्याप्रमाणे आम्ही भाईंसाबना तशी विनंती केली. त्यावर ते एवढेच म्हणाले की हा कार्यक्रम पंडितजींचा आहे, मी फक्त त्यांना साथसंगत देण्यास आलो आहे. ते पत्रकार परिषद घेत असतील तरच मी त्या पत्रकार परिषदेनंतर मुलाखत देईल अन्यथा नाही. कितीही झाले तरी ते बुजुर्ग आहे. झाकीरभाईंचा पंडितजींच्या विषयी असलेला आदर अनेक गोष्टीतून दिसत होता. संध्याकाळी कार्यक्रमाला जायचे वेळी त्यांनी अगदी बजावून सांगीतले की त्यांना आधी नेणे व मग पंडितजींची गाडी आणा कारण ते केवळ साथसंगत करणारे कलाकार आहेत व पंडितजींच्या आधी ग्रीनरूममध्ये त्यांनी स्वत: उपस्थित रहाणे आवश्यक आहे. किती हा आदर व नम्रता! पुष्कळ कार्यक्रमात मी स्वत: सक्रीय असतो व आम्हाला सहकलाकार आधीच फोन करून सांगतात की मुख्य कलाकार निघाले की मग आम्हाला फोन करा. अशा धर्तीवर हा अनुभव एकदम वेगळा होता.
सर्वात मोठी कडी म्हणजे भाईसाबनी त्यांची वाद्ये स्वत: मंचावर आणली. आम्ही त्यांचा तबला व डग्गा घेत होतो परंतु त्यांनी निग्रहाने त्यास नकार दिला व इतकेच म्हणाले की,
“ये मे मेरी सरस्वती है, उसे गुस्सा आयेगा”
त्या क्षणी तर मी पुरता गार झालो. भाईसाबचा सोडून आतापर्यंत पाहीलेल्या सर्व कार्यक्रमात मी असे कधी पाहिले नव्हते. अगदी गल्ली बोळातील तबला वादक सुद्धा त्यांची वाद्ये त्यांचे शिष्य किंवा कोणी इतर मंचावर कसे आणतील याकडे बघतात. काही तबला शिक्षक तर स्वत:च्या गुरूकडे जातांनादेखील त्यांच्या स्वत:च्या शिष्याकडून वाद्ये आणवितात. या पार्श्वभूमीवर हा सुखद अनुभव तर होताच परंतु आपल्या वाद्यांकडे, आपल्या कलेकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन कसा आहे, हे समजले आणि हा कलाकार एवढा महान का झाला ते कळाले.
पंडितजींची व भाईसाबची मैफील संपूच नये असे वाटत होते. परंतु रात्रीचे दहा वाजले होते व मैफील संपविणे भागच होते. दुसरे दिवशी पहाटे सहा वाजता त्यांना विमानतळावर पोहोचवण्यासाठी मी ताजमध्ये गेलो. पाचच मिनिटात ते बाहेर आले. हॉटेलच्या काही कर्मचाऱ्यांना त्यांच्याबरोबर फोटो काढू दिले व आम्ही निघालो. मी विचारले,
“Bhaisab, did you sleep well?”
त्यांच्यातील विनोदबुद्धी लगेचच जागी झाली व म्हणाले,
“I don’t know, I was sleeping.”
आम्ही दोघेही खळाळून हसलो. यावेळी गाडीत आम्ही दोघेच होतो. आयोजकांचे प्रॉब्लेम, प्रायोजकांचे दबाव व त्यांच्यामुळे कलाकारांना होणाऱ्या व्यथा याविषयी ते मनापासून बोलत होते. आम्ही येतो, आमच्याबरोबर फोटो काढले जातात, आमचा मानसन्मान केला जातो, पण त्या फोटो जेवणाबरोबर, रात्री अपरात्री प्रवास केलेले, विमानतळावर काही तास वाट पाहिलेले, नंतर लगेच प्रवास करणारे, रात्री उशीरा झोपून सकाळी विमान पकडण्यासाठी लवकर उठणारे, पत्रकार परिषदेत तेच तेच उत्तरे द्यावी लागणारे कलाकार हे ही माणसेच आहेत व त्यांनाही विश्रांतीची गरज आहे, ही बाब आयोजक व प्रायोजक कसे विसरतात यावर ते विषादाने बोलत होते.
वयाच्या ६२व्या वर्षी हा कलाकार वर्षातून १५०च्यावर मैफीली करतो, कारण उरलेला वेळ सगळा विमानप्रवास किंवा रेकॉर्डींग मध्ये जातो. एकाच आठवड्यात दक्षिण अमेरिका खंडात ब्राझील, चिली नंतर युरोपमध्ये ऑस्ट्रीयात व लगेचच परत दक्षिण अमेरीकेत अर्जेंटिनामध्ये असा जगामधील एका टोकापासून दुसर टोकार्पंत प्रवास हा कलाकार करतो. आपल्या आधीच्या पिढीविषयी असलेली कृतज्ञता, आपल्या बरोबरच्या पिढीविषयी असलेला आदर व पुढच्या पिढीविषयी असलेला विश्वास, त्याचबरोबर सरस्वतीची कृपा असलेला परंतु स्वत:ला एक सर्वसामान्य समजणारा हा कलाकार असामान्य का आहे याचे यथार्थ दर्शन केवळ काही तासांच्या संगतीत झाले. विमान जायची वेळ झाली होती, एखादा घरचा माणूस परदेशात जातांना आसवे भरून यावी तसे मन झाले होते व यावेळी मात्र त्यांचे न ऐकता पाया पडलो व म्हणालो,
“भाईसाब औरंगाबादमे वापीस जरूर आईयेगा, हमे आपका इंतजार हमेशा रहेगा.”
या कार्यक्रमानंतर ते अजून दोन वेळेला औरंगाबादेस आले. त्याही वेळी त्यांच्यासोबत वेळ प्रतित केला, गप्पा झाल्या. २८ जानेवारी २०२० ला परत योग आला. हरिहरन व भाईसाब यांचा हाजीर कार्यक्रम होता. ते आता ६९ वर्षांचे आहेत. बोटांमधील जादू अजूनही तशीच आहे. कार्यक्रमाव्यतिरिक्त त्यांच्या मानेला व हातांना थोडा कंप जाणवला. भाईसाब अमेरिकेत व भारतात दोन्ही ठिकाणी राहतात. यावेळी विमानतळावर पाया पडतांना त्यांच्या हातात भारतीय पासपोर्ट पाहिला. अमेरिकेतील त्यांच्या कायमस्वरूपी वास्तव्याने त्यांच्याकडे अमेरिकेचा पासपोर्ट असेल असे वाटले होते.
“Oh, I thought you would be carrying American Passport.”
“How can I forget, who blessed me.”
आणि ते गेले. एक भारतीयत्वाची कायमस्वरूपी ओळख घेऊन गेले. कलेचा एकत्रित व्यासंग ज्याच्या पासंगालाही पुरणार नाही असा हा नि:संग कर्मयोगी, आता परत कधी भेटेल माहीत नाही. पण माझ्यासाठी ते कायमच भाईसाब असतील.
संजीव शेलार