पिंपरी, दि.४(पीसीबी) पुणे, – आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाचे नेते जोरदार तयारीला लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून विविध जिल्ह्यात जनसन्मान यात्रा काढत आहेत. मात्र आता अजित पवारांना एका आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
उपमुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांना ‘ब्रॉन्कायटीस’चा त्रास होत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. यामुळे लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांना उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहू शकणार नाहीत. राष्ट्रवादी महोदयांना याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.
उदगीर दौरा रद्द
उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या काही महिन्यांपासून जनसन्मान यात्रा, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांची भेट, शासकीय बैठका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने सातत्याने राज्यातील विविध भागांचा दौरा करत आहेत. आज अजित पवारांचा राष्ट्रपतींसोबतच उदगीरचा दौरा आयोजित करण्यात आला होता. मात्र त्यांना ‘ब्रॉन्कायटीस’चे निदान झाले आहे. त्यामुळे त्यांना त्यांचा उदगीर दौरा रद्द करण्यात आला आहे.
अजित पवारांना ‘ब्रॉन्कायटीस’चा त्रास होत असल्याने पुढील काही दिवस विश्रांती करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर ते लगेचच पुन्हा दौरे सुरु करतील. या काळात मुंबईतील शासकीय निवासस्थानातून ते शासकीय कामकाज पाहतील, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने दिली आहे.
ब्रोन्कायटिस म्हणजे काय?
ब्रोन्कायटिस झालेल्या व्यक्तीच्या श्वसननलिकेत सूज येते. आपल्या फुप्फुसातून हवा आत आणि बाहेर केली जाते. मात्र त्या श्वसननलिका फुगल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि श्वास घेण्यात अडचणी येतात. यावेळी व्यक्तीला खूप खोकला होतो. तसेच अधिक प्रमाणात कफ पडतो. श्वसनलिका कमजोर होते आणि फुफ्फुसं खूप प्रमाणात खराब होतात. ब्रोन्कायटिसचे एक्युट ब्रोन्कायटिस आणि क्रॉनिक ब्रोन्कायटिस असे दोन प्रकार असतात. एक्युट ब्रोन्कायटिसमध्ये साधारण सर्दी आणि ताप येतो. तसेच कफ झाल्याने छातीत त्रास होतो आणि श्वास घेणंही कठीण होते. तर एक्युट ब्रोन्कायटिसमध्ये थोडासा तापही असतो. एक्युट ब्रोन्कायटिस होण्याचे प्रमाण लहान मुलांमध्ये जास्त आहे. तर क्रॉनिक ब्रोन्कायटिसमध्ये खोकला आणि कफ होण्याचे प्रमाण अधिक असते. जर योग्य उपचार केले नाही, तर त्याला बरे होण्यास अनेक महिने लागतात.