उद्या आख्खी मुंबई गुजरातमध्ये गेली तर नवल वाटायला नको

0
163

नागपूर, दि. १४ (पीसीबी) : आपल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की, मी पंतप्रधान मोदींचा हस्तक आहे. त्यांनी महाराष्ट्राचा हस्तक असायला हवे, पण केले उलटेच, असा टोला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. नागपूर विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. वेदांता प्रकल्पाबाबत पटोले म्हणाले, उद्या मुंबई गुजरातमध्ये गेली तर नवल वाटायला नको. आपल्या राज्यातले पाणी गुजरातला पाठवले. गुजरातच्या नेत्यांचा आशीर्वाद राहिला पाहिजे, म्हणून महाराष्ट्रातील भाजप नेते हा सर्व खटाटोप करताहेत. उद्या मुंबईत गुजरातमध्ये गेली तर नवल वाटायला नको. गेलेली कंपनी महाराष्ट्रात परत यायला पाहिजे. कारण महाराष्ट्रातील युवकांना रोजगाराची गरज आहे. त्यामुळे सरकारला हा प्रकल्प महाराष्ट्रात परत आणावा लागेल.

राहुल गांधी यांची यात्रा सुरू झाली, तेव्हापासून भाजपमध्ये अस्वस्थता सुरू झाली आहे. तेव्हापासून काँग्रेस आमदारांच्या फुटीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. झारखंड आणि बिहारमध्ये आमदार विकत घेण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. लोकशाही विकत घेण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत आहे. गोव्यामध्येही ऑपरेशन लोटस सुरू झाले आहे, याबाबत विचारले असता, गोव्याबाबत मला काही माहीत नाही, असे नाना पटोले यांनी सांगितले.

कोरोनाच्या काळात साधूंना मारलं, असा भाजपने गवगवा केला. आता भाजपचे गृहमंत्री आहे, हिंदू सम्राट म्हणवून घेणारे सत्तेत आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नाही. मग आता का ते लोक बोलत नाहीत. सांगलीत झालेल्या घटनेचा आम्ही निषेध करतोय. देशात लोकशाही राहिली नाही, स्वतःच्या मस्तीसाठी केंद्र आणि राज्यातील सरकार चालवलं जात आहे. मुख्यमंत्री – पंतप्रधानांशी बोलले, असे म्हणतात आता पीएम मुख्यमंत्र्यांना मान देतात की नाही, हेसुद्धा कळेल, असेही पटोले म्हणाले.

भगवान श्रीराम, पहिले शंकराचार्य आणि रामदास स्वामी यांनी कन्याकुमारी ते काश्‍मीर, अशी यात्रा केली आहे. आता राहुल गांधी ही यात्रा करणारे चौथे व्यक्ती आहेत. राहुल गांधी यांना हिदुत्वाबाबत प्रमाणपत्र देणारे ते कोण, असा सवाल पटोले यांनी केला. राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याची पातळी त्यांची नाही. राहुल गांधी धर्माचं काम करत आहेत. राहुल गांधी यांच्या टी शर्टची चर्चा केली जाते, तेव्हा शहा यांच्या मफलरची आणि मोदी यांच्या सुटा बुटाची चर्चा होतेच. कारण प्रत्येक ठिकाणी जीएसटी लावून सर्वसामान्यांचं जगणं भाजपने कठीण केले आहे. महाराष्ट्राला लुटून गुजरातकडे सर्वकाही पाठवले जात आहे. जी कंपनी गेली त्यामुळे लाखो लोकांना इथे रोजगार मिळणार होता. अशा मोठ्या कंपन्यांना गुजरातमध्ये नेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी केला.