उद्धव ठाकरे गटाच्या वतीने प्रतिज्ञापत्र

0
437

नवी दिल्ली,दि. ३ (पीसीबी) : शिवसेना कोणाची यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सुनावणी होण्यापूर्वी उद्धव ठाकरे गटाच्या वतीने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकार हे ‘विषारी झाडाचे फळ’ असल्याचे म्हटले आहे.

शिंदे गटाच्या आमदारांनी घटनात्मक पाप केले आहे. एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार नापाक हेतूने न्यायालयात पोहोचले आहेत. त्यांनी उपाध्यक्षांविरोधातील अविश्वास ठरावाबाबत चुकीचे विधान केले. पक्षविरोधी कारवाया लपवण्यासाठी बंडखोर आमदारांनी ‘खरी सेना’ असल्याचा दावा करत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली, बंडखोर आमदारांना महाराष्ट्र सोडून भाजपशासित गुजरात राज्यात का जावे लागले हे समजत नाही. पुढे आसाममध्ये भाजपच्या मांडीवर बसावे लागले. त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा होता, तर असे का झाले? गुजरात आणि आसाममध्ये शिवसेनेचा एकही केडर नव्हता हे वेगळे सांगायची गरज नाही. आमदारांना संपूर्ण साधनसामग्री पुरविणारा भाजपचाच कार्यकर्ता होता, असा दावा प्रतिज्ञापत्रात करणात आला आहे.

सरकार सत्तेवर आल्यापासून या आमदारांनी नेहमीच त्याचा गैरफायदा घेतला, यापूर्वी कधीही त्यांनी मतदार/कार्यकर्त्यांच्या नाराजीचा मुद्दा उपस्थित केला नाही. या सरकारचा भाग असल्याबद्दल ते इतके नाराज असते तर पहिल्या दिवसापासून ते मंत्रिमंडळात सामील झाले नसते, असेही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.