उद्धव ठाकरेंचा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदारांना संदेश!

0
221

मुंबई, दि. १९ (पीसीबी) -सोमवारी अर्थात २० जून रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं आहे. शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या चारही पक्षांनी उद्याच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्यात शिवसेनेने आपल्या आमदारांना मुंबईतल्या वेस्टइन हॉटेलमध्ये पाचारण केलं आहे. या सर्व आमदारांशी आज मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी आमदारांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी विधानपरिषद निवडणुकीची अजिबात चिंता वाटत नसल्याचं सांगितलं. तसेच, सुभाष देसाई आणि दिवाकर रावते या ज्येष्ठ शिवसेना नेत्यांचा उल्लेख करत त्यांचं कौतुक देखील केलं.

“…यालाच लोकशाही म्हणतात”
“उद्याच्या निवडणुकीसाठी मी मार्गदर्शन करण्याची गरज नाही. आमदारांची बडदास्त निवडणुकीसाठी ठेवावी लागते. तशी ती ठेवली आहे यालाच लोकशाही म्हणतात. आपलेच आमदार, खासदार, नगरसेवक यांना एकत्र ठेवणं ही आजची लोकशाही आहे. उद्याच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या नंतर हे अजून मोठं चित्र दिसलं पाहिजे. एवढ्या संख्येनं मला आमदार दिसले पाहिजेत. सभांमधून बरंचसं बोलून झालंय. अजूनही बोलण्यासारखं खूप आहे. पण तुमच्यासोबत हा एक दिवस साजरा करावा, असं ठरवलं”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.