ईडी आता रोहित पवार यांच्या मागे

0
214

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – राज्यातील अनेक नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमीरा लागलेला आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक दोघेंही सध्या कारागृहात असून शिवसेनेचे खासदार संजय राऊत देखील कारागृहात आहेत. त्यातच आता ईडीच्या रडारवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार हे देखील आल्याचं दिसून येत आहे. रोहित पवार यांच्या ग्रीन एकर कंपनीची ईडीकडून चौकशी करण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, केवळ सत्तेच्या राजकारणात अडथळा ठरणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी भाजपाकडून सुरवातीला ठाकरे फॅमिली आणि आता पवार फॅमिली टार्गेट करण्यात येत असल्याची चर्चा आहे.

ईडीकडून रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीची प्राथमिक चौकशी ईडीकडून करण्यात येत आहे. रोहित पवार यांच्यासह राकेश वाधवान हे देखील कंपनीच्या संचालकपदी होते. त्यामुळे रोहित पवार यांच्याही अडचणी वाढणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी ईडीला तक्रार मिळाली होती. त्यामध्ये रोहित पवार यांचे राकेश वाधवान यांच्याशी जवळचे संबंध असून त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. २००६ ते २०१२ या कालावधीत रोहित पवार यांनी ग्रीन एकर रिसॉर्ट आणि रिअल टच प्रा. लिमिटेडचे संचालक होते. त्यात त्यांनी गुंतवणूक केली होती. त्यात रोहित पवार यांच्यासह चार लोकांची नावं होती. लखविंदर दयालसिंग, धोंडूराम जैदर, अरविंद परशूराम पटेल हे आहेत. यापैकी लखविंदर दयालसिंग हे राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांचे अत्यंत जवळचे आहेत. लखविंदर हे एचडीआयएल, हार्मनी मॉल्ससह ११ ते १२ कंपनीमध्ये राकेश वाधवान यांच्यासोबत पार्टनर होते. ग्रीन एकर्स प्रा.लि. कंपनीमुळे रोहित पवार आणि लखविंदर यांचे संबंध होते. या कंपनीच्या माध्यमातून मोठी रक्कम देशाबाहेर पाठविण्यात आली, तसेच देशात आली, याची चौकशी व्हावी, अशी तक्रार ईडीला प्राप्त झाली होती.

या तक्रारीवर ईडीकडून चौकशी करण्यात येत असून प्राथमिक तपास सुरू झाला आहे. रोहित पवार यांचे वाधवान यांच्याशी संबंध आहेत, का हेही तपासले जात असल्याचं सांगण्यात येत आहे. कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराची माहिती कंपनीने लपवून ठेवल्याचेही आरोप आहेत. त्यामुळे भविष्यात रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.