इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने आळंदीत वारसा स्थळांचा अभ्यास दौरा….

0
85

आळंदी, दि. 06 (पीसीबी) : भारतातील अठरा शिवपीठांपैकी एक असलेल्या आळंदी देवाची येथील पुरातन वारसा असलेल्या तीर्थ आणि कुंडांचा अभ्यास दौरा इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. साहित्य, इतिहास, संशोधन, अध्यात्म क्षेत्रातील सुमारे शंभरजण सहभागी झाले होते. “आळंदीचे स्थळ महात्म्य पुरातन काळापासून आहे. त्याच्या बहुतेक पाऊलखुणा आता नष्ट झाल्या आहेत आणि ज्या काही शिल्लक आहेत, त्या दुर्लक्षित आहेत. त्याचे संवर्धन आणि जतन करण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबरच आपली सर्वांचीच आहे” , अशा भावना अभ्यास दौऱ्याचे समन्वयक ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केल्या.

आळंदी देवाची येथील इंद्रायणी नदीकाठी असलेल्या तेरा तीर्थांची आणि पुरातन आळंदीची माहिती वारसा स्थळांचे अभ्यासक ॲड. नाजिम शेख यांनी प्रत्यक्ष त्या त्या स्थळांवर जाऊन दिली. विविध धर्मग्रंथांच्या आधारे गेली वीस वर्षे संशोधन करून त्यांनी या स्थळांचा शोध घेतला आहे. ही तीर्थे किंवा कुंड म्हणजे जलस्त्रोत असतात. त्यापैकी कोटीतीर्थ, मत्स्यतीर्थ, संध्यातीर्थ, भागीरथीतीर्थ, कपिलतीर्थ, सर्वतीर्थ, रामकुंड, चक्रतीर्थ, विष्णुपद, श्री कालभैरवतीर्थ आणि कुबेरगंगा मधील तीर्थ इत्यादी तीर्थांची माहिती घेण्यात आली. विविध ग्रंथात उल्लेख असलेली काही तीर्थे अद्याप अज्ञात आहेत. पुराणकाळात आळंदीला “आनंदवन” असे नाव होते. वेळोवेळी आळंदीची नावे तब्बल बारा वेळा बदलत गेली. इंद्रायणी आणि कुबेरगंगा या नद्यांच्या संगमाच्या मधील भागात सिद्धबेट निर्माण झाले. अशी माहिती ॲड. शेख यांनी दिली. त्यांनी विविध संदर्भाच्या आधारे या सर्व जलस्त्रोतांचे संशोधन केले आहे. सर्व वारसा स्थळांच्या नावांचे फलक लावण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सदर स्थळांना हजारो वर्षांचा वारसा आहे. माऊलींच्या आधी सुद्धा फार मोठा इतिहास आळंदीला आहे. नाशिकच्या तोडीचे तीर्थक्षेत्र असल्याने अनेक उत्तरकार्य विधी येथे होत असत. भगवान शिवाने चक्रासुरचा वध येथे केला अशा अख्यायिकेचे संदर्भ सापडतात.

अभ्यास दौऱ्याचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुणे महापालिकेचे निवृत्त उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक आणि नायब तहसीलदार संजय शिंदे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. या दौऱ्यात साहित्यिक राजेंद्र घावटे, संतोष घुले, डॉ. लता पाडेकर, डॉ. सीमा काळभोर, डॉ. पौर्णिमा कोल्हे, प्रा. शंकर जाधव, संगीता थोरात, क्रांती दिवेकर, विजय भिसे, भगवान पठारे, उमेश सातकर, विजय पिरंगुटे, उत्तरेश्वर तोडकर, भालचंद्र वडके, भार्गवी लेले, विवेक नातू, सुलभा कणसे, हिरामण सस्ते, संजय जोशी, गणेश सस्ते, अमर कांदे, सुरेश आल्हाट, ज्ञानेश्वर वायकर, संतोष सस्ते, बाळासाहेब सस्ते, विठ्ठल कामठे, अलंकार हिंगे, रमेश राक्षे, गोविंद जाधव, नंदकुमार वाघमारे, शुभम गौंदर, संदीप गावडे, सुरेश लोखंडे, सुरेश डोळस, निसार महंमद सय्यद, दीपक पटेकर, अमोल पाटोळे, वासुदेव गोडे, निलेश भोसले, रविंद्र पाटील, इत्यादी मान्यवर व अभ्यासक सहभागी झाले होते. इंद्रायणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष इतिहास अभ्यासक संदीप तापकीर, सचिव रामभाऊ सासवडे, अलंकार हिंगे, गणेश शशिकांत सस्ते, सुनील जाधव यांनी या दौऱ्याचे संयोजन केले.

अतिशय दुर्लक्षित असलेल्या परंतु वरील संशोधनात पुरातन संदर्भ असलेल्या सर्व ठिकाणांचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश करावा, तेथे स्वच्छता राखावी, वारसा स्थळाच्या पाट्या लावाव्यात आणि त्यावर लेखनही व्हावे अशा अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केल्या. अखेरीस श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेऊन दौऱ्याची सांगता झाली.