इंद्रायणीच्या डोहात महाशीर माशांची आत्महत्या

0
406

देहू, दि. १३ (पीसीबी) – जगतगुरू संत तुकाराम महाराजांचे देहू आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची आळंदी ही दोन्ही तिर्थक्षेत्रे इंद्रायणी नदीच्या प्रदुषणामुळे आता धोकादायक होत चालली आहेत. महापालिका, नगरपालिका, एमआयडीसी, प्रदुषण नियंत्रण मंडळ आदी सर्वांचेच दुर्लक्ष होत असल्याने नदीचे महागटार झाले असून महाशीर सारखे दुर्मिळ मासे आणि अन्य जलचरांचे अस्तित्वच संपत चालले आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे काल सायंकाळ पासून देहूच्या इंद्रायणी डोहात तीन ते चार फूट लांबीचे महाकाय महाशीर मासे मतृ झाल्याने खळबळ उडाली आहे.

इंद्रायणी नदी प्रदूषण ठिकठिकाणी वाढत आहे. आळंदी येथे इंद्रायणी अनेक दिवसांपासून फेसाळत असतानाच देहू येथे नदी प्रदूषणामुळे नदीतील मासे मृत पावत आहेत. आज (बुधवारी, दि. 13) सकाळी मृत माशांचा खच इंद्रायणी नदीत पहायला मिळाला.

देहूगाव येथे इंद्रायणी नदीच्या काठावर बुधवारी सकाळी नागरिक फिरायला गेले असता त्यांना कापूरवडा येथे शेकडो मासे मृत पावलेले आढळून आले. इंद्रायणी नदीत आजवर वाम, मरळ, चीलापी असे मासे आजवर आढळत होते. मात्र या नदीत देवमाशांसारखे दुर्मिळ मासे देखील असल्याचे आजच्या घटनेवरून निदर्शनास आले आहे.

बुधवारी मृत झालेल्या माशांमध्ये देवमासे देखील मरण पावले आहेत. इंद्रायणी नदी पात्रात ठिकठिकाणी जलपर्णी वाढली आहे. तिथे माशांना पाण्याच्या वरच्या भागात येता येत नाही. त्यामुळे मासे जलपर्णी कमी असलेल्या कापूरवडा परिसरात आले. मात्र या ओढ्यातून शहरातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडले जात असल्याने पाणी अत्यंत प्रदूषित झाले आहे.

इंद्रायणी नदीच्या पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच नायट्रोजनचे प्रमाण अनेक पटींनी वाढलेले आहे. हा नायट्रोजन जलचरांच्या आरोग्यासाठी धोकादायक असतो. नायट्रोजनमुळे या पाण्यात माशांचा जीव गेला आहे.

नदी प्रदूषण कमी करणे तसेच नदीला पुनर्जीवित करण्यासाठी काम करणारे आबा मसुडगे म्हणाले, “मागील काही दिवसांपूर्वी आम्ही स्थानिक प्रशासनाला नदी प्रदूषणाबाबत माहिती दिली होती. मात्र प्रशासन याबाबत काहीही कारवाई करत नाही. शहरातील सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. जलपर्णी वाढली आहे. त्यामुळे जलचरांना आपला जीव गमवावा लागत आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलणे आवश्यक असल्याचेही मसुडगे यांनी सांगितले.