देश, दि. १९ (पीसीबी) – गौतम अदाणींवर पुन्हा घोटाळ्याचे आरोप! काँग्रेस नेते राहुल गांधींनी गौतम अदाणींवर नव्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. ब्रिटिश फायनान्शियल टाईम्सनं दिलेल्या वृत्ताचा हवाला देऊन राहुल गांधींनी यासंदर्भात मोठा दावा केला आहे. “या बातमीमुळे कोणतंही सरकार कोसळू शकेल” असं विधान राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत केल्यामुळे या वृत्ताची चर्चा सुरू झाली आहे. या भारतात इंडोनेशियाहून आयात होणाऱ्या कोळशाची किंमत दुपटीहून जास्त प्रमाणात वाढवली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे यावरून पुन्हा एकदा विरोधकांकडून मोदी सरकारला घेरलं जाण्याची शक्यता आहे.
काही महिन्यांपूर्वी हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अशाच प्रकारे शेअर बाजारात गैरव्यवहार केल्याचा आरोप अदाणी समूहावर करण्यात आला होता. यानंतर अदाणी समूहाच्या शेअरचे दर मोठ्या प्रमाणावर कोसळल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता पुन्हा अदाणींवरील आरोपांची चर्चा होऊ लागली आहे.
काय म्हणाले राहुल गांधी?
“फायनान्शियल टाईम्स ऑफ लंडनमध्ये एक बातमी प्रकाशित झालीये ज्यात त्यांनी म्हटलंय की ‘अदाणी इंडोनेशियातून कोळसा खरेदी करतात. तो कोळसा भारतात येईपर्यंत त्याची किंमत दुप्पट झालेली असते’. या माध्यमातून त्यांनी सामान्य गरीब भारतीयांच्या खिशातून जवळपास १२ हजार कोटी रुपये उकळले आहेत. ही बातमी कोणतंही सरकार कोसळवू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याला वारंवार वाचवत आहेत, अशा माणसाकडून ही थेट चोरी आहे”, असा दावा राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत केला आहे.
काय म्हटलंय फायनान्शियल टाईम्सच्या वृत्तात?
अदाणी समूहाकडून इंडोनेशियातून आयात करण्यात आलेला कोळसा भारतात पोहोचेपर्यंत त्याची किंमत दुप्पट वाढलेली असते, असा दावा या बातमीत करण्यात आला आहे. त्यासाठी काही आकडेवारीही सादर करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांत अदाणींकडून अशा प्रकारे कोळशाचे दर वाढवले जात असल्याचे आरोप केले जात होते. त्याआधारे काही दावे यात करण्यात आले आहेत.
२ वर्षांत ५ बिलियन किमतीच्या कोळशाची आयात
या वृत्तानुसार, गेल्या दोन वर्षांत अदाणी समूहाकून इंडोनेशियातून तब्बल पाच बिलियन डॉलर्स किमतीच्या कोळशाची आयात करण्यात आली आहे. हा दर त्या त्या काळातील बाजारभावापेक्षा तब्बल दुप्पट इतका होता. यासाठी तैवान, दुबई व सिंगापूरमधील अदाणी समूहाच्याच काही मध्यस्थ कंपन्यांच्या माध्यमातून व्यवहार करण्यात आले. या कंपन्या किंवा त्यांचे मालक अदाणी समूहाशीच संलग्न असल्याचं निदर्शनास आल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.
तैवानमधील अशीच एक कंपनी तेथील एका उद्योजकाच्या नावावर नोंद आहे. पण हा उद्योजक अदाणी कंपनीतील एक छुपा भागधारकच असल्याचा दावा वृत्तात करण्यात आला आहे. तसेच, २०१९ ते २०२१ या कालावधीमध्ये अदाणी समूहातील एका कंपनीने ३२ महिन्यांत कोळशाच्या तब्बल ३० शिपमेंट इंडोनेशियाहून भारतात आल्याचं नमूद केलं आहे. या कोळशाचे इंडोनेशियातल्या निर्यात कागदपत्रांमधील दर हे भारतातील आयात कागदपत्रांमधील दरांपेक्षा खूप कमी होते. या सगळ्या व्यवहाराचा एकूण आकडा तब्बल ७ कोटी डॉलर्सच्या घरात जातो, असा दावाही करण्यात आला आहे.
अदाणी समूहाने आरोप फेटाळले
दरम्यान, याच वृ्त्तामध्ये अदाणी समूहाची बाजूही देण्यात आली आहे. अदाणी समूहाने कोणताही गैरव्यवहार झाल्याचा आरोप फेटाळला आहे. हे वृत्तच जुन्या निराधार आरोपांच्या आधारावर देण्यात आलं असून वास्तवाचा सोयीस्कररीत्या चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे, अशी भूमिका अदाणी समूहाकडून घेण्यात आली आहे. अशा प्रकारे कोळशाच्या किमतीत वाढ करण्यात येत असल्याचे आरोप सर्वप्रथम सात वर्षांपूर्वी अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक गुन्हे तपासाचं काम करणाऱ्या डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स विभागाच्या अहवालात करण्यात आले होते.
डीआरआयनं २०१६मध्ये सादर केलेल्या अहवालात पाच अदाणी समूहाच्या कंपन्या व त्यांच्याकडून पुरवठा केला जाणाऱ्या इतर पाच अशा १० कंपन्यांचा समावेश होता. एकूण ४० कंपन्यांचा उल्लेख या अहवालात करण्यात आला होता. कृत्रिमरीत्या या कोळशाच्या दरवाढीबाबत या कंपन्यांचा उल्लेख आला होता. हा सगळा कोळसा इंडोनेशियाहून थेट भारतात येतो. मात्र, त्याची बिलं व कागदपत्र तिसऱ्या मध्यस्थाच्या माध्यमातून तिसऱ्या देशातून भारतात वर्ग करण्यात येतात. यामागे दरवाढ करण्याचा हेतू असल्याचा दावा अहवालात करण्यात आला होता. २०१८मध्येही विरोधी गुजरातमध्ये विरोधी पक्षांनी अशाच प्रकारचा आरोप अदाणी समूहावर केला होता.